थोडक्यात
मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे 3050 गावांमध्ये अतोनात नुकसान
१ जूनपासून मान्सूनशी संबंधित घटनांमध्ये एकूण 104 जणांचा मृत्यू
1 जूनपासून एकूण 2838 प्राण्यांचा मृत्यू
गेली पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, धाराशिव, हिंगोली, लातूर आणि बीड जिल्ह्यांत 3050 गावांमध्ये अतोनात नुकसान झालंय. (Rain) या सगळ्या नुकसानीत १ जूनपासून मान्सूनशी संबंधित घटनांमध्ये एकूण 104 जणांचा मृत्यू झाला आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार, अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, धाराशिव, हिंगोली, लातूर आणि बीड जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या प्रदेशातील 3050 गावांवर परिणाम झाला आहे, ज्यामुळे पिकांचे आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.
मराठवाड्यात 1 जून ते 29 सप्टेंबर दरम्यान झालेल्या 104 मृत्यूंपैकी 26 सप्टेंबरपासून आलेल्या पुरात सात जणांचा मृत्यू झाला आहे. 1 जूनपासून एकूण 2838 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये बीडमधील 685 प्राण्यांचा समावेश आहे, असं अहवालात म्हटलं आहे. नांदेडमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 17, बीडमध्ये 16, हिंगोलीमध्ये 13, जालना आणि धाराशिवमध्ये प्रत्येकी नऊ आणि परभणी आणि लातूरमध्ये प्रत्येकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे, असे अहवालात म्हटले आहे.
अलिकडच्या पुरात 2701 किलोमीटर लांबीचे रस्ते, 1504 पूल, 222 पाण्याचे तलाव, 1064 शाळा, 9567 वीज खांब, स्थानिक शासकीय कार्यालयांच्या 58 इमारती, 392 पाणीपुरवठा योजना, 352 प्राथमिक आरोग्य केंद्रे अंशतः किंवा पूर्णपणे खराब झाली आहेत, असं त्यात म्हटलं आहे. यासंबंधीच्या अहवालात असंही म्हटलं आहे की, वरील दुरुस्तीसाठी 2432.53 कोटी रुपये खर्च येईल.
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड केल्या जातील आणि शेतकऱ्यांना ई-केवायसी करावे लागेल आणि मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करावी लागेल, असं विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी पीटीआयला सांगितलं आहे. या प्रदेशातील पूर कमी होत आहे, परंतु गोदावरी नदीकाठच्या सखल भागात राहणाऱ्या लोकांसाठी सतर्कता बाळगली जात आहे, असं पापळकर यांनी सांगितलं.