वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र दुःख व्यक्त करत आहे. पुणे पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुळशी तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. हुंड्याच्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलले अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. हुंड्याच्या मागणीसाठी वैष्णवीचे सासरच्या लोकांनी तिच्या प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ केला असा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे. ही घटना समोर येताच राजकीयमंडळीकडून तसेच चित्रपटसृष्टीतून संताप व्यक्त करताना दिसत आहे. यात आता अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे Hemant Dhome ने सुद्धा आपला संताप राग व्यक्त केला आहे. त्याने ट्विट पोस्ट केले आहे.
हेमंत ढोमेच्या पोस्टमध्ये नेमकं काय लिहिले आहे?
वैष्णवी हगवणे प्रकरणी हेमंत लिहिले आहे की, वैष्णवी कस्पटे (मुळ नाव) आणि तेच वापरावे! ज्या आडनावाने तिचा बळी घेतला ते नकोच! या आपल्या बहिणीचा आजच्या काळात हुंडाबळी गेलाय! गेली अनेक वर्ष तिचा छळ झालांय… चूक दोन्ही बाजूची आहे… सासरकडच्यांची आणि हुंडा देणाऱ्या आईबापाची सुद्धा! लवकरात लवकर कठीण कारवाई झाली पाहिजे आणि यापुढे आपल्या महाराष्ट्रात तरी अशा घटना होऊ नयेत म्हणून आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे…
हेमंत ढोमे याने पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये त्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केल आहे. तसेच आरोपींना कडक शिक्षा द्यावी अशी मागणी देखील त्याने केली आहे. हेमंतच्या या पोस्टला असंख्य कमेंट्स येत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील पिंपरी येथील वैष्णवी हगवणे नावाच्या विवाहित माहिलेचा मृत्यू झाला. 16 मे 2025 रोजी तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. मात्र तिने आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आला आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. पती, सासू-सासरे तसेच नंदेकडून तिचा छळ केला जायचा, असा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे वैष्णवी आणि तिचा नवरा शशांक या दोघांचा प्रेमविवाह होता.
घरच्यांच्या विरुद्ध जाऊन वैष्णवीने शंशाकसोबत लग्न केले होते. मात्र शंशाक तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. वैष्णवीच्या घराच्यांनी तिच्या लग्नात हुंडा म्हणून 51 तोळे सोनं दिले होते. त्यासोबतच महागडी फॉर्च्यूनर कार सुद्धा येण्याची आली होती. याबरोबरच महागडी भांडी, लग्नानंतर वैष्णवी माहेरी जायची, त्यावेळेस तिला चांदीची मूर्ती, दीड लाखांचा मोबाईल अशा अनेक गोष्टी माहेरच्यांनी तिला दिल्या होत्या. तरीदेखील सासरची मंडळी तिचा छळ करत होती असा आरोप करण्यात आला आहे.