पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमेने पोस्ट शेअर केली आहे.
हेमंत ढोमे पोस्ट करत म्हणाला की, भारत, एक संघराज्य! राज्यघटनेने दिलेला अधिकार म्हणजे आपलं राज्य आपल्या पद्धतीने चालवायचं… म्हणून त्या त्या राज्याचं वेगळं सरकार! त्या सरकारांनी आपली संस्कृती, आपली भाषा, आपले विचार जपायचे आणि वाढवायचे! विविधतेने नटलेला माझा देश आता एकाच भाषेच्या आहारी का द्यायचाय?
जपूद्या आपली भाषा प्रत्येकाला आणि वाढवूद्या आपली संस्कृती प्रत्येकाला!!! मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे! हिंदी ही व्यवहाराची भाषा असूद्या ती आमच्या माथी मारू नका… आणि आहेच की ती शिकायला… येतेच आहे की व्यवहारापूरती… मग हा नवा अट्टाहास कशासाठी? महाराष्ट्रात मराठीच वाढली पाहिजे… येणाऱ्या पिढ्यांच्या अंगा खांद्यावर खेळली पाहिजे… त्यासाठी कष्टं करा! #हिंदी_सक्ती_नकोच. असे हेमंत ढोमेने म्हटले आहे.