ताज्या बातम्या

अंध मुलीची डोळस कहाणी! तिच्या दैदीप्यमान यशाने निर्दयी आई बापाच्या डोळ्यातही अंजन घातलं

वयाच्या दहाव्या वर्षी मालाला कळलं की तिची दृष्टी केवळ ५% आहे.

Published by : Shamal Sawant

ज्या मुलीला तिच्या आईवडिलांनी रेल्वे स्टेशनवर 'ओझं' समजून टाकून दिल तिचंच आज नाव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क परीक्षेच्या यशस्वी उमेदवारांमध्ये झळकतंय. होय, माला आता महसूल सहाय्यक म्हणून नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणार आहे आणि हे सर्व तिच्या अडथळ्यांवर मात करणाऱ्या विलक्षण जिद्दीमुळे शक्य झालं!

रेल्वे स्टेशनपासून शासकीय कार्यालयापर्यंतचा संघर्षमय प्रवास

जळगाव रेल्वे स्टेशनवर अंदाजे २० वर्षांपूर्वी एका छोट्याशा मुलीला तिच्या पालकांनी सोडून दिलं. काही काळ ती रिमांड होममध्ये राहिली. पण तिचं खरं आयुष्य सुरू झालं अमरावतीतील पद्मश्री शंकर बाबा पालकर यांच्या "वज्जर" येथील आश्रमात. बाबा पालकर यांनी मालाला केवळ आसरा दिला नाही, तर तिला एक नवीन आयुष्य, नवी ओळख आणि नवसंजीवनी दिली. त्यांच्या कागदपत्रांमध्येही त्यांनी स्वत:चं नाव माला च्या वडिलांच्या नावाजागी लिहिलं कारण माणुसकी हीच त्यांची नाळ होती.

जेव्हा डोळे साथ सोडतात, तेव्हा मनाचे नेत्र उघडतात

वयाच्या दहाव्या वर्षी मालाला कळलं की तिची दृष्टी केवळ ५% आहे. डोळे हळूहळू साथ सोडत होते, पण तिचं स्वप्न मात्र अधिकच स्पष्ट होतं.ती पुढे स्वामी विवेकानंद ब्लाइंड स्कूल आणि भिवापूरकर ब्लाइंड स्कूलमधून शिक्षण घेते. दहावीला ६०% आणि बारावीला ६५% गुण मिळवते. यशाचा पाया इथेच घातला जातो.

ऑडिओ बुक्सच्या साथीने स्पर्धा परीक्षेची उंच झेप

२०१९ मध्ये मालाने अमोल पाटील यांच्या युनिक अकादमीमध्ये MPSC परीक्षेची तयारी सुरू केली. कोविड काळात वर्ग ऑनलाइन झाले, अंध विद्यार्थ्यांसाठी अडचणी वाढल्या. पण तिथेच जन्म झाला एका नव्या मार्गाचा ऑडिओबुक्सचा! अमोल पाटील यांनी अंध विद्यार्थ्यांसाठी खास ऑडिओबुक्स तयार केली, आणि माला याच ऑडिओ माध्यमातून अभ्यास करत राहिली. २२ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर, १८ एप्रिल २०२५ रोजी माला पापळकरला MPSC च्या निकालाची अधिकृत मेल आली. तो मेल फक्त तिच्या यशाचा संदेश नव्हता तो तिच्या संपूर्ण संघर्षाच्या प्रवासाला मिळालेला गौरव होता.

हजारो संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रेरणा

एका अंध मुलीने, जी कधीच मागे वळून पाहिली नाही, जीवनात इतकं मोठं यश मिळवणं ही केवळ तिचीच नाही, तर संपूर्ण समाजाची जिंकलेली परीक्षा आहे. मालाची संघर्षमय गाथा सांगते की परिस्थिती काहीही असो, स्वप्न पाहायची आणि ती पूर्ण करण्याची हिंमत कोणत्याही दिव्यांगतेच्या पलीकडे जाते.शेवटी एकच वाक्य "आईवडिलांनी सोडलं, पण नियतीने तिला उचलून गगनावर पोहोचवलं!"

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pandharpur : चंद्रभागा नदीत तीन महिला बुडाल्या; दोन महिलांचा मृत्यू तर एका महिलेचा शोध सुरू

Uddhav Thackeray : "'ही' आमच्याकडून झालेली सर्वात मोठी चूक”, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य चर्चेत

Uddhav Thackeray On Thackeray Brand : उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात: 'ठाकरे' म्हणजे महाराष्ट्राची ओळख

मिरचीची भजी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या