मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काल विधानसभा निवडणूक प्रकरणामध्ये आमदार विजय वडेट्टीवार यांना नोटीस बजावून चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. प्रकरणावर न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्यासमक्ष सुनावणी झाली.काँग्रेस उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदारसंघातून विजय मिळविला आहे.
त्यांच्याविरुद्ध स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार ऍड . नारायण जांभुळे यांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे. वडेट्टीवार यांनी 29 ऑक्टोबर 2024 रोजी नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर जांभुळे यांचा आक्षेप आहे. वडेट्टीवार यांनी ज्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर केले, तो स्टॅम्प पेपर त्यांच्या पत्नी किरण वडेट्टीवार यांनी 18 ऑक्टोबर रोजी स्वतःच्या नावावर खरेदी केला. वडेट्टीवार त्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करू शकत नाहीत. त्यामुळे स्टॅम्प कायद्यानुसार त्यांचे प्रतिज्ञापत्र अवैध आहे, असे जांभुळे यांचे म्हणणे आहे.