बृहन्मुंबई महानगरपालिकेने 4 ते 7 डिसेंबर 2025 या कालावधीत समुद्रात सलग मोठी भरती येणार असल्याचा इशारा दिला आहे. या काळात समुद्रात उसळणाऱ्या लाटांची उंची साडेचार मीटरपेक्षा अधिक राहणार असून काही ठिकाणी लाटा पाच मीटरपर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार 6 डिसेंबरच्या मध्यरात्री 12.39 वाजता सर्वाधिक म्हणजे 5.03 मीटर उंचीच्या लाटा येणार आहेत. तर 7 डिसेंबरलाही पहाटे 1.27 वाजता 5.01 मीटर उंचीच्या लाटा उसळतील. उर्वरित भरतीही चार मीटरपेक्षा अधिक उंचीची असेल.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात मोठी गर्दी येते. त्यामुळे या भागात येणाऱ्या नागरिकांनी समुद्रकिनाऱ्याजवळ जाणे टाळावे, असे विशेष निर्देश देण्यात आले आहेत. पोलिस आणि महानगरपालिका वेळोवेळी मार्गदर्शन देणार असून सर्वांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
4 ते 7 डिसेंबरमधील मोठ्या भरतींचे वेळापत्रक :
– 4 डिसेंबर : रात्री 11.52 – 4.96 मीटर
– 5 डिसेंबर : सकाळी 11.30 – 4.14 मीटर
– 6 डिसेंबर : रात्री 12.39 – 5.03 मीटर
– 6 डिसेंबर : दुपारी 12.20 – 4.17 मीटर
– 7 डिसेंबर : रात्री 1.27 – 5.01 मीटर
– 7 डिसेंबर : दुपारी 1.10 – 4.15 मीटर
भरतीच्या वेळेस समुद्राची पातळी वाढते आणि लाटा वेगाने पुढे सरकतात. 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा धोकादायक मानल्या जात असल्याने प्रशासनाने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.