भारतीय उद्योगपती गौतम अदाणी आणि त्यांच्या कंपनींना टार्गेट करणारी अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग कंपनी 'हिंडेनबर्ग रिसर्च' कंपनी बंद होण्याची घोषणा करण्यात आली आहे. या कंपनीचे फाउंडर नेट अँडरसननं यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली. 'हिंडनबर्ग रिसर्च' ने अडाणी समूहाच्या बाजारातील फेरफार आणि अकाऊंटिंग घोटाळ्याचा आरोप केला होता. ज्यामुळे अडाणी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती.
कंपनी बंद करण्याच्या अँडरसनच्या निर्णयाबाबत अँडरसननं, हिंडेनबर्ग बंद करण्याचा निर्णय हा अत्यंत वैयक्तिक असल्याचं सांगितलं. "कोणतीही विशिष्ट गोष्ट नाही. कोणतीही विशेष जोखीम नाही, आरोग्याच्या समस्याही नाहीत आणि कोणतीही मोठी वैयक्तिक समस्या नाही," असं अँडरसननं म्हटलं. सुरुवातीला मला काही गोष्टी सिद्ध करण्याची गरज असल्याचं वाटलं. परंतु आता मला काही प्रमाणात आराम मिळालाय आणि कदाचित हे पहिल्यांदाच झालंय, असंही त्यानं म्हटलं.
हिंडेनबर्ग रिसर्चनं 24 जानेवारी 2023 मध्ये अदानी ग्रुप विरोधात पहिला रिपोर्ट जारी केला होता. त्या मध्ये अदानी ग्रुपवर स्टॉकच्या हेराफेरी आणि फसवणुकीचे आरोप लावण्यात आले होते. ते आरोप अदानी ग्रुपकडून फेटाळण्यात आले होते. मात्र या आरोपानंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे स्टॉक्स कोसळले होते. अदानी ग्रुपचं मार्केट कॅपिटलायझेशन 20 लाख कोटींवरुन 7.50 लाख कोटींपर्यंत आलं होतं.
दरम्यान, नेट अँडरसननं सोशल मीडियावर पोस्ट करुन हिंडेनबर्ग रिसर्च बंद करत असल्याची घोषणा केली. त्यामुळं आज शेअर बाजार सुरु झाला तेव्हा अदानी उद्योग समुहाच्या लिस्टेड कंपन्यांमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये 8 टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली.