प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे सध्या प्रचंड वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शेअर केलेल्या एका रीलमुळे त्यांच्यावर हिंदुत्ववादी संघटनांकडून टीकेची झोड उठली. धमक्या मिळाल्यानंतर अथर्वने संबंधित व्हिडीओ डिलीट केला. मात्र, आता नामांकित वकील असिम सरोदे यांनी त्याच्या पाठीशी उभं राहत, “हा व्हिडीओ डिलीट करणं चुकीचं होतं. तो पुन्हा अपलोड करावा. मग कोण काय करतंय ते बघू,” असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
वादग्रस्त रीलचा मुद्दा काय?
गणेशोत्सवानिमित्त अथर्व सुदामेने टाकलेल्या रीलमध्ये तो मूर्ती विकत घेण्यासाठी मूर्तीकाराकडे जातो. तेव्हा मूर्तीकाराचा मुलगा “अब्बू” अशी हाक मारत आत येतो. हा संवाद रंगल्यानंतर शेवटी अथर्व म्हणतो –"माझे वडील सांगतात, आपण साखर व्हावं जी खीरलाही लागते आणि शीरखुर्म्यालाही... आपण वीट व्हावं जी देवळातही लावली जाते आणि मशिदीतही..." धार्मिक सलोखा आणि सौहार्दाचा संदेश देणाऱ्या या संवादावरून काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला आणि अथर्ववर टीका सुरू केली. परिणामी त्याने व्हिडीओ हटवला, पण या प्रकरणात समाजातील अनेक जण त्याच्या समर्थनार्थ उभे राहत आहेत.