मुंबई महानगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता नामनिर्देशित (स्वीकृत) नगरसेवक पदांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. २२७ नवनिर्वाचित नगरसेवक आणि १० नामनिर्देशित सदस्य असे मिळून एकूण २३७ नगरसेवकांचे सभागृह यावेळी पाहायला मिळणार आहे. या १० स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीसाठी इच्छुकांनी आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग सुरू केल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल १० स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. २०२३ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या विधेयकानुसार, स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाचवरून दहापर्यंत वाढवण्यात आली होती. त्याच निर्णयाची अंमलबजावणी आता मुंबई महापालिकेत होत आहे.
निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येनुसार, भाजपला ४, शिवसेना (शिंदे गट) ला १, तर उद्धव ठाकरे गटाला २ नामनिर्देशित नगरसेवक मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेने पाठिंबा दिल्यास त्यांना ३, तर अपक्षांनी काँग्रेसला साथ दिल्यास काँग्रेसलाही ३ नामनिर्देशित सदस्य मिळू शकतात, अशी राजकीय चर्चा आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीमुळे सभागृहातील संख्याबळाचे गणित काही अंशी बदलू शकते. दरम्यान, पालिकेच्या मुख्यालयातील सभागृहाच्या आसन व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सध्या केवळ २२७ नगरसेवकांसाठीच आसन व्यवस्था उपलब्ध आहे. १० अतिरिक्त स्वीकृत सदस्य वाढल्यास त्यांची बैठक व्यवस्था कुठे आणि कशी करायची, याबाबत प्रशासनाला तोडगा काढावा लागणार आहे.
स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय?
स्वीकृत नगरसेवक हा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील एक विशेष सदस्य असतो. त्याची निवड थेट जनतेतून होत नाही. शहराच्या विकासासाठी विविध क्षेत्रांतील अनुभवी, कार्यकुशल आणि तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश करण्याच्या उद्देशाने ही पदे निर्माण करण्यात आली आहेत.
पात्रता आणि क्षेत्रे
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खालील क्षेत्रांतील मान्यवरांचा स्वीकृत नगरसेवक म्हणून समावेश अपेक्षित असतो—
प्रशासन व कायदा: अनुभवी शासकीय अधिकारी, न्याय व कायदा क्षेत्रातील तज्ज्ञ
आरोग्य व शिक्षण: नामांकित डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य
तांत्रिक व सामाजिक क्षेत्र: अभियंते, सामाजिक कार्यकर्ते, शहर विकासातील तज्ज्ञ
या तज्ज्ञांचा उपयोग शिक्षण, आरोग्य, अभियांत्रिकी आणि इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये धोरणात्मक निर्णयांसाठी केला जाणार आहे.
BMC निवडणूक 2026 पार्श्वभूमी
मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महायुतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची २५ वर्षांची एकहाती सत्ता संपवली आहे. या निकालानंतर आता स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती आयुक्तांच्या शिफारशीने, सभागृहाच्या संमतीने होते आणि अंतिम मंजुरी राज्य सरकार देते. या सदस्यांना निवडून आलेल्या नगरसेवकांप्रमाणेच मानधन, भत्ते आणि विकास निधी मिळतो. ते समित्यांमध्ये सहभागी होऊ शकतात, मात्र महापौर, उपमहापौर किंवा स्थायी समितीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार त्यांना नसतो.