कोविड 19 नंतर चीनमध्ये पुन्हा एकदा नव्या व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणं समोर आली. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना सारख्या विषाणूचा उद्रेक पाहायला मिळतोय. HMPV म्हणजेच मानवी मेटान्यूमोव्हायरस चीनमध्ये वेगाने पसरत आहे. अनेक लोकांना याची लागण झाली असून चीनमधील रुग्णालयांमध्ये HMPV च्या रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे.
प्रामुख्यानं 14 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांमध्ये आणि वयस्कर व्यक्तींना या HMVP म्हणजे ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस विषाणूचा संसर्ग होतोय. चीनचे शेजारी देश या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास सर्दीसारख्या) कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळयाच्या सुरुवातीला उद्भवतो.
मुंबई महापालिका क्षेत्रात HMPV बाधित रूग्ण नाही
मुंबई शहर व उपनगरात असा Human Metapneumo Virus (HMPV) बाधित कोणताही रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत देण्यात येत आहे. या शिवाय नागरिकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापि, खबरदरीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनांच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये यासंदर्भातील सूचनाचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
या गोष्टींची काळजी घ्या-
साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवावेत.
ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहावे.
जेव्हा कधी खोकला किंवा शिंक येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे.
भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक खावे.
संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुवीजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्यावी.
या गोष्टी करण टाळा-
हस्तांदोलन करु नका.
वापरलेल्या टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर.
आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळा.
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करु नये.
सार्वजनिक ठिकाणी थुंकु नये.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका.