उन्हाळ्याची झळ सध्या सगळ्यांनाच जाणवते आहे. पंखा, कूलर, एसी अशी अनेक साधनं हाताशी असली तरी उन्हाळ्यातल्या उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी आतून औषधं घेणं आवश्यक असतं. चला तर आज शरीराला आतून गारवा देणारे घरगुती उपाय जाणून घेऊया.
साहित्य आणि कृती :
छोटासा काळ्या किंवा लाल रंगाचा माठ घ्या. याबरोबरच देशी गुलाबाच्या पाकळ्या. वाळा, अनंतमूळ, ज्येष्ठमध, साळीच्या लाह्या आणि धणे घ्यावेत. दोन लोकांसाठी हे बनवायचे असेल तर माठामध्ये दोन कप पाणी घ्यावे. त्यामध्ये देशी त्यात देशी गुलाबाच्या पाकळ्या 10 ते 12 कापून घेतलेला वाळा एक चमचा, अर्धवट कुटलेलं अनंतमूळ अर्धा चमचा, ज्येष्ठमधाची भरड अर्धा चमचा, थोडेसे कुटलेले धणे पाव चमचा आणि एक मोठा चमचा भरून साळीच्या लाह्या घ्याव्या. हे सगळे पदार्थ मातीच्या माठात टाकून चमच्यानी थोडंसं हलवून, वर झाकण ठेवून द्यावं.
सकाळी उठल्यावर स्वच्छ हातांनी हे सर्व मिश्रण छान कुस्करून घ्यावं आणि गाळणीच्या मदतीनी गाळून घेतलेला हा हिम सकाळी अनशापोटी प्यावा. हे चवीला उत्तम असते आणि त्याचा सुगंधसुद्धा अप्रतिम असतो. घरात, अंगणात मोगऱ्याचं झाड असेल तर यात दोन मोगऱ्याची फुलं टाकली तरी चालतात. उन्हाळ्यातल्या उष्णतेचा त्रास होऊ नये, शरीराला आतून गारवा मिळावा यासाठी हा आरोग्य उपचार करून पाहा.