जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात शनिवारी रात्री सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली असून एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने प्रेमविवाहाच्या रागातून आपल्या मुलीसह जावयावर गोळीबार केला. जावयाच्या बहिणीच्या लग्नानिमित्त आयोजित हळदीच्या कार्यक्रमात निवृत्त पोलीस अधिकारी असलेला किरण मांगले याने आपली मुलगी तृप्ती वाघ व जावई अविनाश वाघ या दोघांवर गोळीबार केला. या घटनेत मुलगी तृप्ती वाघ हिचा जागीच मृत्यू झाला असून जावई अविनाश वाघ गंभीर जखमी झाला आहे. तर या घटनेनंतर जमावाने गोळीबार करणाऱ्या निवृत्त सीआरपीएफ अधिकाऱ्याला चांगलाच चोप दिल्याने गंभीर जखमी झाला आहे. वडिलांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेली तृप्ती ही चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे.
निवृत्त सीआरपीएफ अधिकाऱ्याने उच्चशिक्षित मुलीने कमी शिकलेल्या मुलासोबत केलेल्या प्रेमविवाहाच्या रागातून हत्याकांड घडविल्याचे समोर आले आहे. शनिवारी लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात आरोपीने रेकी करून मुलीसह जावयाला टार्गेट करत गोळीबार केला. मृत तृप्तीचा वडिलांनी याआधी देखील जबरदस्ती गर्भपात केल्याचा आरोप तृप्तीची सासू आणि अविनाशची आई प्रियंका वाघ यांनी केला आहे.