एक नाही, दोन नाही, तर, तब्बल 21 गावांतील नागरिकांना दूषित पाणी प्यावं लागत आहे. पाण्याच्या पुरवठ्यासाठी दोन दोन योजना असूनही शेकडो ग्रामस्थांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे.
महाड तालुक्यातील चिंभावे खाडीपट्ट्यात वसलेल्या 21 गावांतील लोकांची ही अशी अवस्था आहे. या गावांसाठी 32 कोटींची जल जीवन मिशनची योजना मंजूर झाली. खैरे धरणाचं पाणी शुद्ध करण्यासाठी प्रकल्पही उभारला. मात्र, कधी पाईपलाईन जुनी असल्याने तर कधी पाईपलाई फुटल्याने घराघरात असं गढूळ आणि जंतू असलेलं पाणी पोहोचत आहे.
"जलजीवन योजना सरकारी परवानग्यांमध्ये आणि न्यायालयातील कचाटयात सापडलीय. त्यामुळे, नवीन पाईपलाईन पूर्ण होऊ शकलेली नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दूषित पाणी पिण्याची वेळ इथल्या ग्रामस्थांवर आलीय. त्यामुळे अनेक आजारांनाही सामोरं जावं लागतंय... म्हणूनच, सगळ्या योजना सुरू होऊन, 21 गावांना शुद्ध पाणी कधी मिळणार? हा खरा प्रश्न आहे". चिंभावे गावातील सरपंच सायली मनवे यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे.