उद्योजक गौतम अदानी यांच्या झपाट्याने वाढलेल्या साम्राज्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. “गौतम अदानी अवघ्या दहा वर्षांत इतके मोठे कसे झाले?” असा थेट आणि खडा सवाल करत राज ठाकरेंनी या वाढीमागे सरकारचा अप्रत्यक्ष हात असल्याचा आरोप केला. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या प्रचार दौऱ्यावर असून, आज पुणे दौऱ्यात त्यांनी अदानी प्रकरणावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले.
यापूर्वी मुंबईत पार पडलेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी मॅपच्या माध्यमातून अदानी समूहाच्या व्यवसायाचा विस्तार दाखवत केंद्र सरकारवर सडकून टीका केली होती. त्याच मुद्द्याचा पुढचा भाग म्हणून पुण्यात बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज ठाकरे म्हणाले की, “केंद्र सरकारने उभे केलेले ७ ते ८ विमानतळ थेट गौतम अदानींना दिले. यातील एकही विमानतळ अदानींनी स्वतः बांधलेला नाही. फक्त नवी मुंबईचा विमानतळ अदानींनी उभारला आहे.” उद्योगाला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, “मला उद्योग नको असं नाही, पण असा उद्योग नको जो सरकारच्या बळावर वाढतो.”
सिमेंट उद्योगाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “ज्या सिमेंट व्यवसायात अदानी कधीच नव्हते, त्या क्षेत्रात त्यांनी थेट अल्ट्राटेकसारख्या कंपन्या विकत घेतल्या आणि आज ते देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले. ही उडी कशी शक्य झाली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यासाठी कोणत्या बँका आणि वित्तीय संस्थांना सरकारने अदानींना अर्थसहाय्य करायला भाग पाडले, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
पुढे बोलताना राज ठाकरे यांनी संभाव्य धोक्याचा इशाराही दिला. “उद्या एकच माणूस संपूर्ण देशाला वेठीस धरू शकतो. इंडिगो एअरलाईनच्या उदाहरणातून देशाने पाहिलं आहे की, एका कंपनीचा व्यवसाय ठप्प झाला तर त्याचे किती गंभीर परिणाम होतात. उद्या सर्व गोष्टी कोलॅब्स झाल्या तर नोकऱ्या जातील, देश ठप्प होईल,” असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील शहरांवर अशाच पद्धतीने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न झाला, तर तो राज्यासाठी मोठा धोका ठरेल, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला. दरम्यान, ठाकरे बंधूंनी मुंबईतील सभेत अदानींवर केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर देत जोरदार भाषण केले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अदानी मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.