थोडक्यात
PM केअर फंडाच्या आरोपांवरून राऊतांनी फडणवीसांना सुनावले
राऊतांनी भाजपाचे बोलणे म्हणजे मुर्खाचे बोलणे असल्याचा टोला लगावला
पीएम केअर फंडमध्ये किती पैसे? राऊतांचा प्रश्न
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. 26 सप्टेंबर) दिल्ली येथे जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. साधारणतः तासभर चर्चा पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये झाली. या भेटीमध्ये फडणवीसांनी मराठवाड्यातील पूरस्थितीची मोदींना माहिती दिली. या भेटीनंतर फडणवीसांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पीएम केअर फंडावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. याच आरोपांवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. राऊतांनी भाजपाचे बोलणे म्हणजे मुर्खाचे बोलणे असल्याचा टोला लगावला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (ता. 27 सप्टेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएम केअर फंडावरून केलेल्या आरोपांबाबतची विचारणा करण्यात आली. तेव्हा राऊतांनी फडणवीसांवर जोरदार पलटवार केला. मुख्यमंत्री फडणवीसांवर केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देत राऊतांनी म्हटले की, हे भाजपवाल्यांचे मूर्खासारखे बोलणे आहे. एखादी गोष्ट त्यांच्या अंगलट आली की, ते विषय दुसऱ्या टोकाला नेतात. हा विषय मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आहे. कोविडमध्ये काय झाले हा प्रश्न आता कोणी विचारला आहे का? कोविडमध्ये महाराष्ट्राइतकी सुव्यवस्था, सुरक्षा कुठल्याच राज्यात नव्हती. तेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. हे आत्ताच्या पोपटांना कळले पाहिजे, असा टोला राऊतांनी लगावला.
तसेच, उत्तरप्रदेश, बिहारसारख्या राज्यात जिथे भारतीय जनता पक्षाची राजवट होती, तिथे कोविड काळात अनागोंदी, अराजकता माजली होती. ज्या गंगेच्या किनाऱ्यावर तुम्ही कुंभमेळा केला, ती गंगा कोविडमध्ये बेवारस प्रेतांनी कशी वाहत होती हे जगाने पाहिलेले आहे. मिस्टर देवेंद्र फडणवीस ते फोटो जरा पाहा त्यानंतर महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारचे आरोप करा, असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावार हल्लाबोल केला. पण, भारतीय जनता पक्षाचा हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की, ते स्वीकारत नाही. लडाखमध्ये दंगल झाली तर दुसऱ्यावर दोष दिला. तुमची आश्वासन तुम्ही पूर्ण केले नाही. तुम्ही वांगचूकला कशाला अटक करतात? खोटं बोलायचं हे भाजपाचे कायमचे धोरण आहे. हा प्रश्न मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आहे. तीन-चार वर्षापूर्वी कोविडमध्ये काय झाले हा नाही. हे लोक कुठून उत्खनन करून असे विषय काढतात हे मला माहित नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपावरही जोरदार पलटवार केला आहे.
पीएम केअर फंडमध्ये किती पैसे?
यावेळी राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पीएम केअर फंडाबाबत प्रश्न विचारत म्हटले की, ते मुख्यमंत्री किंवा मंत्री असतील. पण, आम्ही सुद्धा काहीतरी आहोत. आम्हालाही काय आहे ते माहीत आहे. पीएम केअर फंडमध्ये किती पैसे आहेत? हे फडणवीसांना माहीत आहे का? नसेल तर मी सांगतो. महाराष्ट्रातून किती रक्कम जमा झाली आणि मुंबईतील फार्मा कंपन्यांनी किती लाख कोटी दिले हे माहिती आहे का? देवेंद्र फडणवीसांना माहीत नसेल तर मी आकडा देतो. तेच पैसे आता आमच्या शेतकऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी, त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जर आम्ही मागितले तर तुम्ही मागचं उकरतात. ही कुठले धोरण तुम्ही आणलेले आहे? असे प्रश्न राऊतांनी उपस्थित केले आहेत.