केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर माफ करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा लाभ केवळ नवी करप्रणाली स्वीकारणाऱ्यांना मिळणार आहे. अर्थमंत्र्यांच्या भाषणात जुन्या करप्रणालीवर कोणताही बदल झाल्याचा उल्लेख नाही, म्हणजेच ती प्रणाली तसेच राहील. नव्या करप्रणालीमुळे अनेक लोकांमध्ये करदायित्वाबाबत संभ्रम आहे, कारण नवीन टॅक्स स्लॅब्सची माहिती नीट समजून न घेतल्यामुळे गोंधळ उडाला आहे.
४ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही
निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलेल्या नवीन करप्रणालीनुसार, ४ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही. ४ लाख ते ८ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के कर, ८ ते १२ लाख रुपयांपर्यंत १० टक्के, १२ ते १६ लाख रुपये उत्पन्नावर १५ टक्के, १६ ते २० लाख रुपयांवर २० टक्के, २० ते २४ लाख रुपयांवर २५ टक्के, आणि २४ लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर ३० टक्के कर लागणार आहे.
मात्र, १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर ७५ हजार रुपयांचा स्टँडर्ड डिडक्शन लागू होईल, ज्यामुळे ४ लाख ते १२ लाख रुपयांमधील दोन स्लॅब्सवर जाहीर केलेला कर (५% आणि १०%) प्रत्यक्षात लागू होणार नाही. यामुळे १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.
त्यानुसार, १२ लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तीला पहिल्या ४ लाख रुपयांवर कर भरावा लागणार नाही. उर्वरित उत्पन्नावर योग्य टॅक्स स्लॅब्सनुसार कर लागेल. उदाहरणार्थ, जर कोणाचं उत्पन्न १४ लाख रुपये असेल, तर त्याच्या उत्पन्नावर पहिल्या ४ लाखांवर कर लागणार नाही. ४ ते ८ लाख रुपयांवरील उत्पन्नावर ५% कर (२०,००० रुपये), ८ ते १२ लाख रुपयांवरील उत्पन्नावर १०% कर (४०,००० रुपये), आणि १२ ते १४ लाख रुपयांवरील उत्पन्नावर १५% कर (३०,००० रुपये) लागेल. यामुळे त्या व्यक्तीला ९०,००० रुपये कर भरावा लागेल.