पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसीय मुंबई दौऱ्यात विकासकामांना गती देतानाच राजकीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या बैठका घेतल्या. 8 ऑक्टोबर रोजी त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले, हे या दौऱ्याचे मुख्य आकर्षण ठरले. त्यानंतर मोदींनी मुंबई मेट्रो-3 प्रकल्पाच्या काही टप्प्यांचे उद्घाटन केले.
हे प्रकल्प मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत. दिवसभराचे कार्यक्रम पुर्ण झाल्यानंतर 8 ऑक्टोबरच्या रात्री ते मुंबईत दाखल झाले आणि राजभवनात मुक्काम केला. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत खास बैठक घेतली, ज्यामध्ये आगामी निवडणुकांची रणनीती, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि केंद्र सरकारच्या योजना यावरील चर्चा झाली.
आज, 9 ऑक्टोबर रोजी, पंतप्रधान मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांच्यासोबत बैठक घेतली ही बैठक ‘व्हिजन 2035' अनुषंगाने घेतली गेली होती. ही बैठक मुंबईच्या राजभवनात झाली. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, संरक्षण, शिक्षण आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर सखोल चर्चा झाली. भारत-ब्रिटन संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्वाची मानली जात आहे.
त्यानंतर मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे सीईओ फोरम आणि ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलला देखील पंतप्रधान मोदींनी उस्थिती दाखवली. त्यानंतर दुपारी, मोदी यांनी भाजपच्या आमदार - खाजदार व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत ‘विकासाच्या राजकारणा’वर भर देण्याचे आवाहन केले. केंद्र सरकारच्या योजना आणि महाराष्ट्रातील अंमलबजावणी यावर त्यांनी समाधान व्यक्त केले.