थंडीच्या दिवसांत बाजारात ताज्या भाज्यांची रेलचेल असते. याच काळात मिळणारी लसूण पात ही चव आणि आरोग्य दोन्हीसाठी उत्तम मानली जाते. लसूण वापरल्याने जेवणाला छान सुगंध येतोच, पण शरीरासाठीही तो फायदेशीर ठरतो. लसूणमुळे प्रतिकारशक्ती वाढते, पचन सुधारते आणि शरीरातील घातक घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
हिवाळ्यात मिळणाऱ्या ताज्या लसूण पातीपासून झटपट ठेचा तयार करता येतो. हा ठेचा भाकरी, चपाती किंवा जेवणासोबत खायला मस्त लागतो.
साहित्य:
लसूण पात, हिरवी मिरची, शेंगदाणे, जिरे, धणे, थोडा लसूण, तेल, मीठ, कोथिंबीर
कृती:
लसूण पात स्वच्छ करून बारीक कापा. कढईत तेल गरम करून त्यात जिरे, धणे, शेंगदाणे आणि हिरवी मिरची भाजा. नंतर त्यात लसूण पात व लसूण घालून हलवा. मिश्रण शिजल्यावर मीठ आणि कोथिंबीर घाला. थंड झाल्यावर खलबत्यात थोडं कुटा. तयार ठेचा हिवाळ्यातील जेवणाची रंगत नक्कीच वाढवेल.