(Tulsi Vivah 2025 ) कार्तिकी एकादशी म्हणजेच देवउठनी एकादशी या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि शुभ कार्यांचा प्रारंभ होतो. या मंगल प्रसंगी तुळशी विवाहाचा सोहळा साजरा केला जातो. यावर्षी तुळशी विवाहाचा मुहूर्त २ नोव्हेंबर २०२५ ते ५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान आहे. या दिवसांमध्ये भक्त घराघरांत तुळशी-विष्णू विवाहाचा पवित्र विधी पार पाडतील.
तुळशी विवाहाची पौराणिक कथा
दंतकथेनुसार, असुरराज जालंदराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती. तिच्या पतिव्रतेच्या शक्तीमुळे जालंदर अजेय बनला होता. देवतांना त्याचा पराभव शक्य नव्हता. तेव्हा भगवान विष्णूंनी जालंदराचे रूप धारण करून वृंदेची परीक्षा घेतली. सत्य कळल्यावर वृंदेने स्वतःचा देह त्याग केला. तिच्या तपश्चर्येमुळे ती तुळशीच्या रूपात प्रकट झाली. तिच्या भक्तीचा सन्मान राखण्यासाठी श्रीविष्णूंनी तुळशीशी विवाह केला. म्हणून प्रत्येक वर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह साजरा केला जातो.
तुळशीचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व
तुळस ही पवित्र, औषधी आणि पर्यावरणपूरक वनस्पती आहे. ती केवळ देवपूजेतच नव्हे तर आरोग्यासाठीही महत्त्वाची मानली जाते. तुळशीचे पान वाहिल्याने विष्णू प्रसन्न होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. वैज्ञानिकदृष्ट्या, तुळस प्रदूषण शोषून घेत ऑक्सिजन उत्सर्जित करते. त्यामुळे प्रत्येक घराच्या अंगणात तुळशीवृंदावन बांधले जाते.
तुळशी विवाहाचे महत्त्व
विवाहातील अडथळे दूर होतात: तुळशी विवाह केल्याने लवकर शुभ विवाहयोग जुळतो.
अखंड सौभाग्य लाभते: विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा विधी करतात.
कन्यादानाचे पुण्य मिळते: ज्यांना कन्या नाही, त्यांनी तुळशी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य लाभते.
सुख-समृद्धी नांदते: शाळीग्राम-विष्णू आणि तुळस-लक्ष्मी यांच्या मिलनाने घरात धन, आरोग्य आणि समाधान प्राप्त होते.
चातुर्मास समाप्तीचे प्रतीक: या विवाहानंतर सर्व शुभ कार्यांना परवानगी मिळते.
तुळशी विवाहासाठी आवश्यक साहित्य
तुळशीचे वृंदावन, शाळीग्राम किंवा विष्णू-कृष्णाची मूर्ती, नवीन साडी किंवा ओढणी, धोतर, बांगड्या, हळद-कुंकू, मंगळसूत्र, अक्षता, पंचामृत, धूप, तुपाचा दिवा, सुपारी, नारळ, ऊस आणि मिठाईचा नैवेद्य — हे सर्व साहित्य विवाहविधीसाठी आवश्यक आहे.
तुळशी विवाहाची पद्धत
तुळशी विवाह साधारणपणे कार्तिक शुद्ध द्वादशीच्या संध्याकाळी केला जातो. त्या दिवशी तुळशीवृंदावन स्वच्छ करून रांगोळी काढतात. तुळशी आणि शाळीग्राम किंवा बाळकृष्ण यांचा विधीपूर्वक षोडशोपचार पूजन करतात. मंगलाष्टक गाऊन तुळशीला वरमाळा घालतात, फटाके फोडतात आणि प्रसाद वाटतात. अशी श्रद्धा आहे की, ज्या घरात हा विवाह होतो, त्या घरातील उपवर मुलामुलींचा विवाह लवकर ठरतो.
तुळशीची आरती
जय देव जय देवी जय माये तुळशी।
निज पत्राहुनी लघुतर त्रिभुवन हे तुळशी।।
ब्रह्मा केवळ मूळीं मध्ये तो शौरी।
अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारो।।
सेवा करिती भावें सकळहि नरनारी।
दर्शनमात्रं पापें हरती निर्धारी।।
शीतल छाया भूतल व्यापक तूं कैसी।
मंजिरिची बहु आवड कमलारमणासी।।
सर्व दलविरहित विष्णू राहे उपवासी।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी।।
अच्युत माधव केशव पीतांबरधारी।
तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी।।
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी।
गोसावीसुत विनवी मजला तूं तारी।।
यंदा २ ते ५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान तुळशी विवाहाचे शुभ मुहूर्त लाभले आहेत. सूर्यास्ताच्या वेळी विवाह सोहळा केल्यास उत्तम मानला जातो. भक्तिभावाने केलेला हा विधी केवळ एक परंपरा नाही, तर विष्णूभक्तीचा आणि जीवनात सकारात्मकतेचा सुंदर उत्सव आहे.