सरतं वर्ष बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भारतासाठी खास ठरलं आहे. भारताने वर्ल्ड चॅम्पियनशिपवर आपलं नाव कोरल्यानंतर आता पुन्हा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं आहे. भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिने रविवारी इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरचा पराभव करून दुसऱ्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
दुसऱ्यांदा पटाकावले बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद
ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने 2019 मध्ये जॉर्जियामध्ये ही स्पर्धा जिंकली होती. बुद्धिबळपटू चीनच्या झू वेनजुननंतर हे विजेतेपद एकापेक्षा जास्त वेळा जिंकणारी हम्पी ही दुसरी खेळाडू ठरली आहे. ३७ वर्षीय हम्पीने संभावित ११ पैकी ८.५ गुणांची कमाई करून इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरचा पराभव केला.
नुकतंच डी. गुकेशने सिंगापूरमध्ये जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत चीनच्या डिंग लिरेनला नमवलं. सप्टेंबरमध्ये भारताने बुडापेस्ट येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच खुल्या व महिला गटात सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. हम्पीने जागतिक जलद (रॅपिड) बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत नेहमीच चमकदार कामगिरी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीचं अभिनंदन करून कौतुक केलं आहे.
कुटुंबाला दिलं यशाचं श्रेय
कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच ही कामगिरी शक्य झाली. जेव्हा आपण स्पर्धेसाठी प्रवास करतो तेव्हा आपले आई-वडील मुलीची काळजी घेतात. ३७व्या वर्षी जगज्जेतेपद मिळवणे सोपे नाही. जेव्हा तुमचे वय वाढत असते, तेव्हा लक्ष केंद्रित करणेही महत्त्वाचे असते. आपण हे करू शकले यात समाधान आहे. पहिल्या फेरीतील पराभवानंतर हम्पी जेतेपदाचा विचार करत नव्हती. सलग चार फेऱ्या जिंकल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने मदत मिळाली.