उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्याच्या राजकारणासह प्रशासनालाही मोठा धक्का बसला आहे. विशेषतः अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती देत, अजित पवारांनी 2026-27 च्या अर्थसंकल्पाची सखोल तयारी आधीच पूर्ण केली होती, असे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “अजित पवार म्हणजे कामाचा माणूस होता. त्यांनी अर्थसंकल्पासाठी महिन्यांपूर्वीपासून तयारी सुरू केली होती. प्रत्येक विभागाचा अभ्यास, खर्चाचे नियोजन, महसूलवाढीचे उपाय आणि सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या योजना यावर त्यांनी सविस्तर काम केले होते.” अजित पवारांचा अर्थसंकल्प हा विकासाभिमुख, शेतकरी, महिला, युवक आणि मध्यमवर्ग केंद्रस्थानी ठेवणारा असणार होता, असेही त्यांनी नमूद केले.
फडणवीस पुढे म्हणाले की, “दुर्दैवाने दादांचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच ते आपल्यातून गेले. मात्र त्यांनी जे काम केले आहे, जी दिशा दिली आहे, तो अधुरा राहू दिला जाणार नाही. अजित पवारांचा ‘अधुरा’ अर्थसंकल्प मी स्वतः पूर्ण करणार आहे.” मुख्यमंत्री म्हणून ही जबाबदारी आपण पूर्ण ताकदीने पार पाडू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अजित पवारांनी तयार केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसारख्या थेट घोषणांपेक्षा दीर्घकालीन उपाययोजनांवर भर होता. सिंचन प्रकल्प, कृषी पायाभूत सुविधा, ग्रामीण रोजगार, तसेच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतुदी करण्याचा त्यांचा विचार होता. याशिवाय, महिलांसाठी आर्थिक सबलीकरणाच्या योजना आणि युवकांसाठी कौशल्यविकास व रोजगारनिर्मितीवरही लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, अजित पवारांनी केलेल्या सर्व नोंदी, विभागीय बैठकांचे निष्कर्ष आणि आर्थिक आराखडे सुरक्षित आहेत. अर्थसंकल्प तयार करताना त्याच आधारावर पुढील प्रक्रिया केली जाईल. “हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ नसेल, तर दादांच्या विचारांचा, त्यांच्या कामाच्या शैलीचा प्रतिबिंब असेल,” असेही फडणवीस म्हणाले. राज्य सरकार अजित पवारांच्या आठवणींना आदरांजली म्हणून हा अर्थसंकल्प सादर करेल आणि तो सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.