मुंबई महापालिकेतील महापौर पदाच्या शर्यतीवरून राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून भाजपवर आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपकडून समर्थन मिळणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, “एकमेकांवर दबाव टाकण्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जातात.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या भाषणाचा संदर्भ देत संजय राऊत म्हणाले, “मोदी यांचे भाषण तुम्ही ऐकले असेल. पहिल्यांदाच त्यांनी ‘मुंबईत भाजपचा महापौर बसेल’ अशी भाषा वापरली. पण ज्या प्रकारचे आकडे मुंबईकरांनी दिले आहेत, त्यावरून भाजपचा कुठलाही विजय झालेला नाही.” मोदींनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला देत त्यांनी मोदींना मुंबईचा राजकीय इतिहास माहित नसल्याची टीका केली. “मुंबईत शिवसेनेची परंपरा आहे. मोदींचे भाषण लिहिणाऱ्यांचा इतिहास कच्चा आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला. महापौर शर्यतीबाबत विचारले असता राऊत म्हणाले, “आम्ही अजून काही ठरवलेले नाही. माझ्या माहितीनुसार भाजपकडूनही सदस्य हलवण्याची तयारी सुरू आहे.” देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असतील तर आनंदच आहे, असे सूचक वक्तव्य करत त्यांनी “मराठी पंतप्रधान होईल” असेही विधान केले.
नगरसेवक उदय सामंत यांच्या भूमिकेवर भाष्य करताना राऊत म्हणाले, “आमचे नगरसेवक घरी आहेत. तुमचे नगरसेवक का डांबून ठेवावे लागत आहेत?” शिंदे गटावर टीका करत त्यांनी “श्रीकांत शिंदे यांचा आसाराम बापू झाला आहे,” असे वादग्रस्त वक्तव्य केले. कल्याणमध्ये 11 चा गट स्थापन होईल, तसेच मुंबईतही वेगळा गट स्थापन होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. “एकनाथ शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण शिंदे यांना चावी देणारे कोण?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
नारायण राणे यांच्यावरही टीका करताना राऊत म्हणाले, “तुमचेही संख्याबळ तपासा. राणे यांचे वय झाले आहे, त्यांची काळजी घेतली पाहिजे.” ताज लँड एण्ड भेटीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही जेवायला जातो का, आतले लोक कुठे जेवायला जातात, अशा गोष्टी सांगत नसतात.” काँग्रेसचे नगरसेवक फुटणार नाहीत आणि त्यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महापौर कोण बसणार, यावर शेवटी राऊत म्हणाले, “सध्या चारचा फरक आहे. दोघांमध्ये काय होतं ते बघू. आमचा महापौर का निवडला जाणार नाही? मुंबईची परंपरा शिवसेनेच्या महापौराची आहे. ज्या दिवशी भाजपचा महापौर बसेल, त्या दिवशी मुंबईत शोककळा होईल.”