अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर 25 टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. तसेच, भारताने रशियाकडून खरेदी केलेल्या कच्च्या तेलावरही दंडात्मक कारवाई होणार असल्याचे सूचित केल्याने भारतीय शेअर बाजार आणि चलनावर याचा त्वरित परिणाम दिसून आला.
गुरुवारी सकाळच्या सुरुवातीच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 582.49 अंकांनी घसरून 80,899.37 वर आला. त्याचवेळी निफ्टी निर्देशांकही 151.70 अंकांनी घसरून 24,802.45 वर बंद झाला.
डॉलरसमोर रुपयात थोडी सुधारणा
रुपया डॉलरच्या तुलनेत सत्राच्या सुरुवातीला 87.66 वर व्यवहार करत होता, जो की गेल्या काही महिन्यांतील नीचांकी स्तर होता. यामध्ये १४ पैशांची सुधारणा झाली असून बुधवारी रुपया 87.80 या विक्रमी नीचांकावर गेला होता.
विदेशी चलन व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मते, मागील तीन वर्षांत एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी घसरण होती – ८९ पैशांची घसरण. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून हस्तक्षेप होण्याची शक्यता वाढली आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
जागतिक घडामोडींचा प्रभाव
डॉलर इंडेक्स – जो सहा प्रमुख चलनांशी अमेरिकी डॉलरची ताकद दर्शवतो – तो 0.03% नी घसरून 99.78 वर पोहोचला आहे. याचा अर्थ, डॉलरमध्ये थोडी नरमाई आली आहे, परंतु रुपयावर दबाव कायम आहे.
परकीय गुंतवणुकीत घसरण
बाजारात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) बुधवारी 850 कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे शेअर्स विकले, ज्यामुळे शेअर बाजारात आणखी अस्थिरता वाढली. फेडरल रिझर्व्हने दरकपात न केल्याचा परिणामही बाजारावर जाणवला.
व्यापार करारांबाबत चर्चा सुरू
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. निर्यातदारांना वाट पाहावी लागत असून, टॅरिफ व दंडाच्या पार्श्वभूमीवर हा करार महत्त्वाचा ठरू शकतो.