'लोकशाही मराठी' चॅनलतर्फे छत्रपती संभाजी नगरमध्ये 'लोकशाही मराठवाडा संवाद 2025' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान मराठवाड्यातील अनेक दिग्गजांचा सत्कारदेखील केला गेला. मराठवाड्याच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी राजकीय नेत्यांचे व्हिजन काय आहे? तसेच मराठवाड्याच्या विकासाचा रोडमॅप कसा असावा? याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी, AIMIM चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासोबत निवडणुकीतील पराभवाच्या कारणांसह वक्फ बोर्ड आणि जातनिहाय जनगणनेसारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना इम्तियाज जलील यांनी निवडणुकीतील पराभवाची कारणमिमांसा केली. त्यांना 2024 ला मतदारांनी तुमच्यावर विश्वास का टाकला नाही ?, असे विचारले असता ते म्हणाले की, "एकच कारण आहे याचे खोके, याची तुलनाही करू शकत नाही. जेवढे पैसे आजच्या घडीला भाजपकडे आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहेत, तेवढे कोणत्याही पक्षाकडे नाहीत. ज्या प्रकारे त्या पैशांचा वापर करण्यात आला आहे. ते मी आता लाईव्ह चॅनेलमध्ये उघडपणे सांगत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी हेलिकॉप्टरमधून पैसे आणण्यात आले होते. ते पैसे पोलिसांच्या गाड्यांमधून गावांगावात वाटण्याचं काम झालं होते. लाईव्ह टीव्ही चॅनेलमध्ये हे मी अनेदा बोललो आहे. मी पोलिसांवर इतकं बोट दाखवतोय. पोलिसांची जबाबदारी नाही का की, इम्तियाजला नोटीस पाठवावी. तुम्ही आमची बदनामी करत आहात. यासाठी तुम्हाला नोटीस पाठवतं आहोत. त्यांनी तस केलं नाही. तशी नोटीस त्यांनी दिली असती, तर मी सिद्ध केलं असतं की कोणत्या हेलिकॉप्टरनं किती वाजता पैसे आले, अशा पद्धतीने पोलिसांच्या गाड्यांमधून ते पैसे गावांमध्ये पोहोचले होते. एक गोष्ट नक्की आहे, तुम्हीही चांगल काम करा, कितीही शिक्षित असाल, कितीही मुद्दे उचला, निवडणुका या देशांमध्ये दुर्दैवाने मराठा, ओबीसी, दलित, मुस्लीम, ब्राम्हण, जैन याच मुद्द्यांवर होते, तिकिट देण्यापासून याची सुरूवात होते."
"2019 ते 2024 पर्यंत अनेक मुद्दे लोक सभेत घेतले. जालना रोडवर दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक येत होत. सगळ्यांनी समर्थन केलं मी एकट्याने त्याला विरोध केला. आपल्याला खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांच्या नावाने हॉस्पिटल उभारा. त्याच ठिकाणी 400 बेड्सच्या हॉस्पिटलचं काम सुरू आहे. 2026 पर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे", असे त्यांनी नमूद केले.