अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात पिकांची पाहणी गेलेल्या काका- पुतणा परतलेच नाही. मोर्शी तालुक्यातील निंभी येथील काका- पुतण्या शेतातील कांद्याच्या पिकांची पाहणी करायला गेले होते. पुतण्याला विजेचा जोरदार झटका बसल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शिरखेड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आसोना शेतशिवारात घडली.
संजय बळीराम भुयार वय 55 व प्रणव गणेश भुयार वय 18 असे मृत काका पुतण्याचे नाव आहे. भुयार यांच्या शेतात कांदा हे पीक लावले असून ते काढण्याचे काम सुरू असल्याचे समजते. संजय व प्रणव हे आपल्या शेतात कांदा पीक पाहण्यासाठी गेले होते.
शेतात गेल्यानंतर प्रणवने विजेची मोटर सुरू करताच त्याला विजेचा झटका लागला. पुतण्याला विजेचा झटका लागलेला पाहताच त्याचा काका संजय हा त्याला सोडवायला गेला असता त्याला सुद्धा विजेचा जोरदार झटका लागला आणी दोघांचा मृत्यू झाला. या भुयार कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.