छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ढाबे आणि हॉटेलमध्ये बिनधास्त दारू रिचवणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यसेवन आणि दारू विक्रीविरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेत गेल्या वर्षभरात तब्बल १७१६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. परिणामी, १,९२५ मद्यपींना कोर्टात हजर राहण्याची वेळ आली असून, न्यायालयात त्यांच्यावर खटले दाखल झाले आहेत.
अनेक व्यावसायिक सरकारी परवाना न घेता त्यांच्या हॉटेल, ढाब्यांमध्ये दारू विक्री करत होते. बीड बायपास, चिकलठाणा, केंब्रिज परिसर, झाल्टा फाटा आणि ग्रामीण भागांमध्ये याचा विशेष प्रमाणात त्रास जाणवत होता. ग्राहक बाहेरून दारू घेऊन हॉटेलमध्ये बसून पित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर विभागाने कारवाईची चक्रे फिरवली.
कारवाईदरम्यान फक्त व्यवस्थापक आणि वेटरवर कारवाई करून प्रकरण थांबवले जात होते. मात्र, गेल्या तीन वर्षांत विभागाने धोरण बदलून थेट ढाबा आणि हॉटेल मालकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी वैध परवाने घेण्याकडे वळत शासनाच्या महसुलात वाढ झाली. फक्त मार्च व एप्रिल २०२५ मध्येच १८७ ढाब्यांवर छापे टाकण्यात आले, तर ६ हातभट्टी चालकांना अटक करण्यात आली. बनावट आणि आरोग्याला घातक मद्य तयार करणाऱ्यांविरुद्धही विभागाने कठोर कारवाई केली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधितांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली जाते. येथे किमान ₹१० पासून दंड आकारला जाऊ शकतो, आणि अंतिम रक्कम न्यायालय निश्चित करते. “कोणालाही कुठेही दारू विक्री किंवा मद्यपान करण्याची परवानगी नाही. गेल्या तीन वर्षांत आम्ही या समस्येवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. व्यावसायिकांनी वैध परवाना घेऊनच व्यवसाय करावा,” असे स्पष्ट आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी केले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध दारूविक्री आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई सुरू असून, नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांना यापुढे माफ केले जाणार नाही. विभागाच्या कठोर मोहिमेमुळे जिल्ह्यात शिस्तबद्धता निर्माण होत असून, महसुलातही सकारात्मक वाढ होत आहे.