जम्मू-काश्मीरमधून मोठी राजकीय आणि सामाजिक घडामोड समोर आली असून, आरक्षण धोरणाविरोधातील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. या कारवाईमुळे जम्मू-काश्मीरच्या राजकारणात आणि विद्यार्थी वर्गात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या आरक्षण धोरणाविरोधात विद्यार्थ्यांनी आज (रविवार) श्रीनगरमधील गुपकर रोड येथे शांततापूर्ण आंदोलनाची घोषणा केली होती. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणाऱ्या राजकीय नेत्यांना आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नजरकैदेचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत मेहबूबा मुफ्ती, त्यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार आगा सैयद रुहुल्लाह मेहदी, पीडीपी नेते वाहीद पर्रा तसेच श्रीनगरचे माजी महापौर जुनैद मट्टू यांचा समावेश आहे.
या घडामोडींमुळे जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विद्यार्थी प्रश्नांवर पुन्हा एकदा तीव्र चर्चा सुरू झाली असून, पुढील काळात या आंदोलनाचं स्वरूप अधिक व्यापक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित नेत्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, त्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा दिल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे.
दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून जम्मू-काश्मीरमध्ये असंतोष वाढत आहे. आरक्षण कोटा प्रणालीच्या अंमलबजावणीत होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सुमारे एक वर्षापूर्वी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. मात्र, अद्याप त्या समितीचा ठोस अहवाल किंवा निर्णय समोर आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.
पीडीपी नेते वाहीद पर्रा यांनी या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा देऊ नये म्हणून नेत्यांना घरात नजरकैदेत ठेवणं ही दुर्दैवी बाब आहे.” तर खासदार रुहुल्लाह मेहदी यांनी शनिवारी रात्री सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या निवासस्थानाबाहेर सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती दिली. “हे विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ होणाऱ्या शांततापूर्ण आंदोलनाला दडपण्याचा पूर्वनियोजित प्रयत्न आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.