रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात नवनिर्वाचित नगरसेविकेचे पती मंगेश काळोखे यांची निघृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तींनी मंगेश काळोखे यांची निर्घृणपणे हत्या करून त्यांचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण पसरलं असून राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खोपोलीतील एका मुख्य रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह नागरिकांच्या निदर्शनास आला. तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या खोपोली पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता मृत व्यक्ती मंगेश काळोखे असल्याची ओळख पटली. त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा असून धारदार शस्त्राने वार केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
मंगेश काळोखे हे नवनिर्वाचित नगरसेविकेचे पती असल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणाला राजकीय पार्श्वभूमी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
या प्रकरणी खोपोली पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून संशयितांच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. तसेच, मृत व्यक्तीचे वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध तपासले जात आहेत. दरम्यान, या घटनेमुळे खोपोली शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली असून, पोलिसांकडून लवकरच या हत्येचा छडा लावण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.