ताज्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar : विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेले 'छोटे पंढरपूर'; वाळूजजवळील भाविकांचे श्रद्धास्थान

टाळ-मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जल्लोष, चंद्रभागेच्या आठवणी जागवत भक्तांची पावले सोलापूरच्या पंढरपूरच्या दिशेने वळतात.

Published by : Team Lokshahi

टाळ-मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जल्लोष, चंद्रभागेच्या आठवणी जागवत भक्तांची पावले सोलापूरच्या पंढरपूरच्या दिशेने वळतात. परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूजजवळ असलेल्या कुंचेगावात, ‘छोटे पंढरपूर’ म्हणून ओळखले जाणारे विठ्ठल-रुक्मिणीचे पावन स्थळ भाविकांचे श्रद्धास्थान ठरले आहे.

नगर-औरंगाबाद महामार्गालगत वसलेले हे प्राचीन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पंचक्रोशीतील भक्तांचे आराध्य स्थान मानले जाते. गावातील वयस्कर भक्तांच्या सांगण्यानुसार, स्वयं विठ्ठल-रुक्मिणी यांनी या भूमीला पावन केल्याची आख्यायिका येथे प्रचलित आहे.

दाट झाडी आणि काटेरी रस्त्यांमध्ये लपलेल्या या प्राचीन मंदिराचा १९६४ मध्ये पहिला जीर्णोद्धार झाला. वळदगाव, वाळूज आणि परिसरातील दानशूर भक्तांनी पुढाकार घेऊन या मंदिराचे सौंदर्य वृद्धिंगत केले. मंदिरातील गाभाऱ्यातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती मोठ्या पंढरपूरच्या मूर्तींसारख्या हुबेहूब आहेत. मंदिराभोवती असलेल्या देव-देवतांच्या आणि संतांच्या मूर्तिशिल्पांनी हे स्थान भक्तिरसाने नटले आहे.

एमआयडीसीच्या स्थापनेनंतर परिसराचा औद्योगिक विकास वेगाने झाला. त्या जोडीने येथे येणाऱ्या भक्तांची संख्याही वाढत गेली. १९८५ नंतर मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार झाला आणि आज दिसणारे भव्य मंदिर त्याच काळात आकारास आले.

पिढ्यानपिढ्यांचा जपलेला वारसा

“जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर,” अशा संतवाणीतील भावार्थ जपणारे येथील वृद्ध भक्त आजही आपली परंपरा आणि श्रद्धा जपताना दिसतात. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही सेवा विश्वस्त मंडळाच्या नेतृत्वाखाली टिकवली जात आहे. अध्यक्ष रत्नाकर दगडुजी शिंदे, सचिव भिकाजी काशीनाथ खोतकर, आणि इतर विश्वस्त व गावकरी या वारशाचे रक्षण करत आहेत.

पदस्पर्शाची आख्यायिका

गावातील पुराणकथेनुसार, पुंडलिकाच्या भेटीसाठी निघालेल्या विठ्ठल-रुक्मिणी यांना या परिसरातील दक्षिणवाहिनी खाम नदी आणि रम्य निसर्गाने मोहून टाकले. पंढरपूरच्या चंद्रभागेसारखेच सौंदर्य येथे पाहून त्यांनी काही काळ विश्रांती घेतली आणि या भूमीला पावन केले. त्या ठिकाणीच त्यांच्या पावसाच्यां खुणा उमटल्या आणि हे स्थान ‘छोटे पंढरपूर’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

आजचे छोटे पंढरपूर

आजही आषाढी आणि कार्तिकी एकादशीला येथे टाळ-मृदुंगाचा गजर, हरिनामाचा गूंज आणि भक्तांचा महापूर पाहायला मिळतो. जणू काही पंढरपूरची छोटी प्रतिकृतीच येथे अनुभवायला मिळते. छोटे पंढरपूर हे केवळ मंदिर नाही, तर भक्ती, परंपरा आणि श्रद्धेचा संगम आहे. वाळूजच्या औद्योगिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवरही हे ठिकाण भक्तिरसाने नटलेले, वारकरी संप्रदायाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करणारे पवित्र स्थान ठरले आहे.

हेही वाचा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."