स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक नेते, माजी आमदार, माजी नगरसेवक आपल्या सोईच्या पक्षात उडी मारताना दिसतायत. काही ठिकाणी तर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातही फुट पडताना दिसत आहे. काही ठिकाणी अनपेक्षितपणे युती होत असल्याचे दिसत आहे. नाशिक शहरात तर सर्वांनाच चकित करणारे युती समोर आली आहे. अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष तसेच भाजपाने एकत्र येत येथे शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला एकटे पाडले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या स्थानिक नेत्यांसाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे यांचा पक्ष एकाकी
मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या भगूर नगरपरिषद निवडणुकीत महायुतीत फूट पडली आहे. येथे भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या दोन पक्षांची युती झाली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नगरीत शिवसेना शिंदे गटाला महायुतीपासून दूर ठेवण्यात आले आहे. येथे आता शिंदे गटाच्या विरोधात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित लढणार आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीने भगूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन या युतीची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर आता अजित पवार यांची राष्ट्रवादी भाजपाच्या पाठिंब्याने नगरपरिषदेची निवडणूक लडवणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकावडे यांच्या नावाची नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
आमदार आहेर यांनी दिली महत्त्वाची माहिती
या युतीबाबत देवळाली मतदारसंघाचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार सरोज आहेर यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे. भगूर नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही राष्ट्रवादी आणि भाजपची युती जाहीर करत आहोत. आम्ही युती जाहीर करत असून दोन्ही पक्ष उमेदवार निवडून आणण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. आमच्याकडे शिंदे गटाकडून युतीसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही. राष्ट्रवादी पक्ष नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहे. आमच्या उमेदवार राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्ष प्रेरणा बलकवडे, असतील असे आहेर यांनी सांगितले.