आषाढी एकादशीनिमित्त कालपासूनच लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. मात्र त्यावेळी एका सुरक्षारक्षकाने किरकोळ कारणावरून भाविकाशी वाद घालून त्याला जबरदस्त मारहाण केल्याची क्रूर घटना आज समोर आली आहे. या घटनेमुळे भाविक संतप्त झाले असून त्याच्यावर कडक कारवाईची मागणी भाविकांकडून होत आहे.
काल याची देही याचा डोळा असे विहंगम दृश्य काल आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात पाहायला मिळाले. काल आपल्या विठ्ठल रखुमाईला भेटण्यासाठी लाखो भाविकांचा गोतावळा काल पंढरपुरात अवतरला होता. मात्र या सुंदर विलोभनीय दृश्याला एका धक्कादायक घटनेने गालबोट लागले. गोपाळपूर रोडवरील पत्राशेड येथील दर्शन बारीमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी उभ्या असलेल्या नागपूरमधील भाविकाला एका खासगी सुरक्षारक्षकाने आज बेदम मारहाण केली. काही शुल्लक कारणावरून आधी त्या दोघांमध्ये वाद झाला.
त्यात बीव्हीजी कंपनीचा खासगी सुरक्षा रक्षक भडकला. त्याने मागचा पुढचा विचार न करता त्या भाविकाला आपल्या हातातील काठीने मारायला सुरुवात केली. या मारहाणीत भाविकाच्या पाठीवर आणि दंडावर गंभीर झाल्या आहेत. सुरक्षा रक्षकाने भाविकला केलेल्या बेदाम मारहाणीत भाविक रक्तबंबाळ झाला आहे.या घटनेमुळे भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या प्रकरणात संबंधित सुरक्षा रक्षकाला माफी मागण्यास सांगितले असून संबंधित सुरक्षा रक्षकाला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. आता यावर मंदिर समिती काय ऍक्शन घेईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.