सांगलीतल्या दसरा मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली. नुकत्याच झालेल्या वक्तव्यांवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांना तंबी दिली होती. मात्र, त्यानंतरही पडळकरांनी आपली भूमिका कायम ठेवत राजकीय वातावरण अधिकच तापवले आहे.
पडळकर म्हणाले की, “मी जयंत पाटील हे राजारामबापूंची औलाद नाहीत असं म्हटलं ते सत्य आहे. यावरून मी माघार घेणार नाही. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ लावला जातोय. त्यांनी मला गोप्या म्हटलं, तर मी त्यांना जंत्या म्हणतो.” असे वक्तव्य करून त्यांनी पुन्हा एकदा थेट जयंत पाटलांवर निशाणा साधला.
याच भाषणात पडळकरांनी जयंत पाटलांना “मंगळसूत्र चोर” असं संबोधत, ते आव्हान देतील त्या ठिकाणी जाण्यास आपण तयार असल्याचंही सांगितलं. या विधानामुळे राजकारणात वैयक्तिक टीकेची पातळी आणखी खाली गेल्याची टीका होत आहे.
दरम्यान, राजकीय वर्तुळात या घडामोडींवरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी दोन्ही नेत्यांनी वैयक्तिक हल्ल्यांपासून दूर राहावे आणि मतदारांच्या भावनांचा आदर राखावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
विशेष म्हणजे, काहींचं मत आहे की शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी असे वाद निर्माण केले जात आहेत. लोकांच्या खऱ्या समस्या बाजूला राहून नेत्यांमधील वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप रंगत चालल्याने राजकारणाचा स्तर घसरतोय, अशी टीका जनतेकडून व्यक्त केली जात आहे.