राज्याच्या राजकीय पटावर गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) मनसे युतीच्या चर्चांना अखेर उद्धव ठाकरे यांनी थेट उत्तर दिलं आहे. पक्षाच्या वरिष्ठ बैठकीत त्यांनी युतीबाबत मत मांडतानाच कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या, “मनसेसोबतच्या युतीवरचा निर्णय पक्ष घेईल, पण तुम्ही सर्वच जागांसाठी तयारीला लागा.”
मुंबई आणि एमएमआरए क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि निवडणूक रणनितीविषयी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. मनसेसोबतच्या संभाव्य युतीच्या मुद्द्यावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले की, निर्णय पक्षपातळीवरच घेतला जाईल. मात्र, त्या निर्णयाच्या प्रतिक्षेत न राहता प्रत्येक जागेसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं, असं त्यांनी स्पष्टपणे सूचित केलं.
गेल्या काही काळात ठाकरे बंधूंनी दिलेल्या अप्रत्यक्ष संकेतांमुळे ही युती प्रत्यक्षात येण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण उद्धव ठाकरेंच्या या निवेदनाने सध्या तरी पक्ष पूर्ण ताकदीने स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होते. पक्षश्रेष्ठींकडून आलेला हा संदेश म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम न निर्माण होऊ देता त्यांना स्पष्ट दिशा देण्याचा प्रयत्न आहे. संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर निर्णय प्रक्रिया सुरू असली, तरी संघटनात्मक सज्जतेस कोणतीही तडजोड नको, हीच भूमिका उद्धव ठाकरे यांनी या बैठकीतून अधोरेखित केली.