Solapur : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या राजकारणात तापमान वाढले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे नेते शरद कोळी यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “कोण प्रणिती शिंदे ते सांगा, मी चिल्लर माणसाला ओळखत नाही,” अशा शब्दांत कोळी यांनी थेट निशाणा साधला. शरद कोळी म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी विधानसभेला सांगितले होते की, शिवसेनेमुळे तुम्ही खासदार झाला आहात आणि महाविकास आघाडीचा धर्म पाळा. मात्र, प्रणिती शिंदे यांनी तो आदेश पाळला नाही. त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म मातीत आणि गाळात नेऊन विरोधकांशी हातमिळवणी केली.”
ते पुढे म्हणाले, “प्रणिती शिंदे यांनी त्यांचं राजकारण शिजवण्यासाठी महाविकास आघाडीचा विचार केला नाही. त्यामुळे आम्हाला अद्दल घडली आहे. आता पुढे आम्ही काँग्रेससोबत कोणत्याही परिस्थितीत युती करणार नाही. खासदार प्रणिती शिंदे असतील तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही आम्ही युती करणार नाही, अगदी राज्यातील युती तुटली तरी हरकत नाही.”
कोळी यांनी शिवसैनिकांनाही इशारा दिला, “युती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई केली जाईल. उद्धव ठाकरे यांचा आदेश न पाळणारा आमच्यासाठी चिल्लर आहे.” शरद कोळी यांनी शेवटी हल्ला अधिक तीव्र करत म्हटलं, “शिवसेनेचा पाठिंबा नसता तर प्रणिती शिंदे साध्या नगरसेवकही झाल्या नसत्या. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे प्रणिती शिंदे यांच्यासोबत आम्ही युती करणार नाही म्हणजे करणार नाही.” शरद कोळी यांच्या या वक्तव्यामुळे सोलापूरच्या राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव गट) यांच्यातील आगामी निवडणुकीतील संभाव्य युतीवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता असून, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव वाढला आहे.