“थांबा…यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत एकदाच बटन दाबून मतदान संपणार नाही!” असा अनुभव अनेक मतदारांना येणार आहे. कारण जानेवारी 2026 मधील या निवडणुकीत मतदानाची पद्धतच बदलली आहे. नेहमीसारखं ईव्हीएमसमोर उभं राहून एकदाच बटन दाबलं आणि मतदान झालं, असं यावेळी होणार नाही. चुकून एक मत कमी दिलं, तर तुमचं संपूर्ण मतदानच अमान्य ठरू शकतं. त्यामुळे मतदान केंद्रात जाण्याआधी हे नियम माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मतदान करताना मत कसं नोंदवायचं आणि EVM वर किती वेळा बटन दाबायचं य एक वेगळी पद्धत महानगरपालिका निवडणुकीत मतदारांना अनुभवायला मिळेल.
बहुसदस्यीय निवडणूक म्हणजे काय ?
बहुसदस्यीय निवडणूक म्हणजे एका प्रभागातून एक नव्हे तर चार नगरसेवकांची निवड होणार आहे. प्रभाग रचनेनुसार एका प्रभागात चार उमेदवारांचे पॅनल असणार असून, मतदारांना या चारही उमेदवारांसाठी स्वतंत्र मतदान करावे लागणार आहे. आधीच्या पद्धतीत एका वॉर्डमधून फक्त एक नगरसेवक निवडला जात होता. त्या वेळी एक मतदार, एक उमेदवार आणि एक मत अशी सोपी प्रक्रिया होती. मात्र नव्या पद्धतीत एका वॉर्डमधून चार नगरसेवक निवडले जाणार असल्याने, चारही मतं देणे बंधनकारक आहे.
मतदान करताना मतदारांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. मतदार चार वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांना मत देऊ शकतात किंवा एका पक्षाच्या चारही उमेदवारांना मत देऊ शकतात. यामध्ये कोणतीही अट किंवा बंधन नाही. जर तुम्हाला चारपैकी कोणत्याही उमेदवाराला मत द्यायचं नसेल, तर NOTA म्हणजे 'नोटा'चा पर्यायही उपलब्ध असेल. शेवटी, ड जागेसाठी मतदान केल्यानंतर ईव्हीएममधून एक बजर वाजेल. हा आवाज म्हणजे तुम्ही चारही जागांसाठी मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे, याची खात्री असणार आहे. म्हणूनच मतदानाच्या दिवशी गोंधळ न होता शांतपणे आणि पूर्ण माहिती घेऊन मतदान करणं प्रत्येक मतदाराचं कर्तव्य आहे.