उत्तर प्रदेशातील औरिया जिल्ह्यात एक अजबच घटना घडली आहे. एका व्यक्तीची 80 हजार रुपयांनी भरलेली बॅग माकडानं हिसकावली आणि झाडावर जाऊन त्या बॅगेतील नोटांचा अक्षरशः पाऊस पाडला. हा प्रकार पाहून लोक थक्क झाले. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती आपल्या कामासाठी रोख रक्कम घेऊन जात असताना अचानक झाडावरून उतरलेल्या माकडानं बॅग हिसकावून घेतली. झाडावर चढल्यानंतर माकडानं बॅग फाडली आणि त्यातील 80 हजार रुपयांच्या नोटा हवेत उडवून दिल्या. त्यामुळे काही वेळ परिसरात पैशांचा वर्षाव झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.
या घटनेमुळे आजूबाजूच्या नागरिकांची झुंबड उडाली. अनेकजण हवेत उडणाऱ्या नोटा पकडण्यासाठी धावताना दिसले. व्हिडीओमधील दृश्ये पाहून नेटिझन्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हा प्रकार विनोदी म्हटला तर काहींनी व्यक्तीच्या मोठ्या नुकसानीबद्दल सहानुभूती व्यक्त केली.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, औरिया जिल्ह्यात माकडांचा त्रास सतत वाढत चालला आहे. ते घरं, दुकानं आणि आता थेट रस्त्यावरूनही वस्तू हिसकावू लागले आहेत. मात्र, ८० हजार रुपयांच्या पैशांचा असा वर्षाव प्रथमच पाहायला मिळाल्याने हा प्रकार गावभर चर्चेचा विषय ठरला आहे.