आयकर विभागाने शुक्रवारपासून (18 जुलै 2025) ITR-2 फॉर्मचे ऑनलाइन भरणे सुरू केले आहे. त्यामुळे आता वेतनधारक, भांडवली नफा मिळवणारे, क्रिप्टोमधून उत्पन्न मिळवणारे आणि इतर गुंतवणूकदार आता थेट आयकर ई-फायलिंग पोर्टलवर आपले विवरणपत्र भरू शकतात.
याआधी केवळ ITR-1 आणि ITR-4 हे फॉर्म ऑनलाइन तसेच Excel युटिलिटीमध्ये उपलब्ध होते. तर ITR-3 सध्या फक्त Excel युटिलिटीच्या स्वरूपात आहे. मात्र आता ITR-2 हे फॉर्म ऑनलाइन मोडमध्ये 'प्री-फिल्ड डेटा'सह उपलब्ध झाले आहे, अशी माहिती आयकर विभागाने ‘X’ वर दिली आहे.
ITR-2 कोण दाखल करू शकतो?
टॅक्स2Winचे सह-संस्थापक आणि चार्टर्ड अकाउंटंट अभिषेक सोनी यांच्या मते, ITR-2 फॉर्म हे खालील प्रकारच्या उत्पन्नासाठी असलेल्या व्यक्तींसाठी आहे:
वेतन किंवा पेन्शन उत्पन्न
एकाहून अधिक घरमालकी उत्पन्न
लॉटरी, घोड्यांच्या शर्यतीमधून मिळणारे उत्पन्न किंवा इतर विशेष दराने करपात्र उत्पन्न
कोणत्याही आर्थिक वर्षात अनलिस्टेड इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली असल्यास
कंपनीचा संचालक असलेली व्यक्ती
भारतातील किंवा परदेशातील उत्पन्न असलेली व्यक्ती
भांडवली नफा किंवा परदेशी मालमत्ता
कृषी उत्पन्न ₹5,000 पेक्षा अधिक असल्यास
क्लबिंग प्रावधान लागू होणारे उत्पन्न
परदेशी बँक खात्यांवर सही अधिकार असलेली व्यक्ती
घरमालकीवरील तोटा पुढे नेण्याची योजना असलेली व्यक्ती
कलम 194N अंतर्गत TDS वजा झाले असल्यास
ITR-2 मध्ये नविन बदल कोणते?
नवीन आर्थिक वर्षासाठी ITR-2 फॉर्ममध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत:
23 जुलै 2024 पूर्वी आणि नंतरच्या भांडवली नफ्यांचे वेगळे विवरण
शेअर बायबॅकवरील तोटा दाखवता येणार, जर संबंधित लाभांश ‘इतर स्रोतां’मध्ये दाखवलेला असेल (01 ऑक्टोबर 2024 नंतर)
मालमत्ता व दायित्व अहवालासाठी उत्पन्न मर्यादा ₹1 कोटीपर्यंत वाढवण्यात आली आहे
कलम 80C व 10(13A) मधील सवलतींसाठी अधिक तपशील आवश्यक
Schedule-TDS मध्ये TDS कोड नमूद करणे बंधनकारक झाले आहे
ITR-2 भरताना लागणारी महत्त्वाची कागदपत्रे
1. फॉर्म 16 – नोकरीवरील वेतनाचे विवरण
2. फॉर्म 16A – इतर TDS (उदा. बँक व्याजावर)
3. फॉर्म 26AS – TDS ची एकत्रित माहिती
4. भाडे पावत्या – HRA सवलतीसाठी
5. भांडवली नफ्याचा अहवाल – शेअर्समधील व्यवहारासाठी
6. बँक पासबुक, FDR, बचत खाते – व्याजाच्या माहितीकरिता
7. घरभाड्याचे उत्पन्न, व्याजाचा हिशोब, स्थानिक कराची माहिती
8. सवलतींसाठी पुरावे – विमा, दान, शिक्षण फी, भाडेकरिता पावत्या
9. मागील वर्षाचा तोटा असल्यास ITR-V प्रत
महत्वाची तारीख:
ITR दाखल करण्याची अंतिम मुदत – 15 सप्टेंबर 2025
आयकर ई-फायलिंग पोर्टल: https://incometax.gov.in