आजचा दिवस भारतीय अंतराळ इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे कारण, तब्बल चार दशकांनंतर भारताचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी अंतराळाकडे झेप घेतली आहे. अॅक्सिओम-4 या खासगी अंतराळ मोहिमेच्या माध्यमातून ते अवकाशात झेपावले असून, त्यांनी त्यांच्यासोबत भारताचे संस्कार, भावना, आणि गाजर हलवा नेला आहे.
आज, 25 जून रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 12:01 वाजता फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून अॅक्सिओम-4 मिशन अंतराळात झेपावला आहे. या मोहिमेचे नेतृत्व अनुभवी अंतराळवीर पेगी व्हिटसन यांनी केले आहे. टीममध्ये भारताचे शुभांशू शुक्ला, पोलंडचे स्लावोज उझनान्स्की-विस्निव्स्की, आणि हंगेरीचे टिबोर कापू हेही सहभागी आहेत.
अंतराळ मोहिमेवर जाताना कोण काय घेऊन जातं? काही साधनं, काही वैज्ञानिक प्रयोग, पण शुभांशू शुक्ला हे त्यांच्या बॅगमध्ये आंब्याचा रस, मूगडाळ हलवा आणि गाजर हलवा नेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या लहानपणाच्या आठवणी, भारतीय स्वाद आणि देशाच्या संस्कृतीचा गोडवा घेऊन ते आकाशात झेपावले आहेत. यावेळी शुक्ला म्हणाले की, “मी केवळ आवश्यक गोष्टी घेऊन जात नाहीये, मी अब्जावधी भारतीयांचे स्वप्न घेऊन निघालो आहे. आणि हो, गाजर हलवाही सोबत आहे!”
या मोहिमेत शुभांशू शुक्ला एक छोटा, सॉफ्ट टॉय हंस देखील घेऊन जात आहेत — ज्याचं नाव आहे ‘जॉय’. अवघ्या पाच इंचाचा हा छोटा मित्र, मिशनचा पाचवा ‘अनौपचारिक’ सदस्य ठरणार आहे. प्रक्षेपणानंतर, जॉयचं हवेत तरंगणं हे सूचक असेल की यान शून्य गुरुत्वाकर्षणाच्या अवस्थेत पोहोचलं आहे. या हंसाचं महत्व देशनिहाय देखील लक्षवेधी आहे. भारतात ते सरस्वतीचं वाहन, म्हणजेच ज्ञान आणि शुद्धतेचं प्रतीक आहे. पोलंड आणि हंगेरीमध्ये देखील हंसाला पवित्रता, सौंदर्य आणि निष्ठेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे, ‘जॉय’ ही फक्त खेळणी नाही, तर संस्कृती आणि भावना यांचा एक हळवा दूत आहे.
1984 साली राकेश शर्मांनी भारताचं अंतराळात प्रतिनिधित्व केलं होतं. आज, 2025 मध्ये शुभांशू शुक्ला त्या इतिहासात नवा अध्याय जोडणार आहेत. विज्ञान, संस्कृती आणि स्वप्न यांचा संगम घडवणारी ही मोहीम केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायक आहे. गाजर हलव्याच्या गोडीइतकीच ही मोहीमही अवकाशात भारतीय अस्मितेची गोडी सुगंध पसरवणार आहे.