Asia Cup 2025 : आशिया कप 2025 मधील भारत–श्रीलंका सामना निकालामुळे नव्हे, तर सामन्यानंतर घडलेल्या एका क्षणामुळे चर्चेत आला आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने श्रीलंकेच्या तरुण अष्टपैलू दुनिथ वेल्लालागेला सामन्यानंतर जवळ घेतलं आणि त्याला भावनिक आधार दिला. ही घटना पाहून अनेकांचे डोळे पाणावले.
काल झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 203 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात श्रीलंकेने पथुम निसांकाच्या झंझावाती खेळीच्या जोरावर 20 षटकांत 202 धावा केल्या. सामना बरोबरीत संपल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली आणि त्यात भारताने विजय मिळवला. अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार हे निश्चित झाले असले तरी, भारत–श्रीलंका लढत संपूर्ण स्पर्धेतील थरारक सामन्यांपैकी एक ठरली.
सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू हस्तांदोलन करत असताना सूर्यकुमार यादव आणि दुनिथ वेल्लालागे एकमेकांसमोर आले. यावेळी सूर्याने त्याला घट्ट आलिंगन दिलं. काही दिवसांपूर्वीच दुनिथवर मोठं दु:ख कोसळलं होतं. 18 सप्टेंबरला श्रीलंका–अफगाणिस्तान सामन्यादरम्यान मोहम्मद नबीने वेल्लालागेच्या एका षटकात पाच षटकार लगावले होते. हा प्रसंग घरी टीव्हीवर पाहताना दुनिथच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने क्रिकेटविश्व हळहळून गेलं होतं.
त्यामुळे सूर्याने सामन्यानंतर दुनिथला आधार दिला, त्याच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि बराच वेळ त्याच्याशी बोलत राहिला. श्रीलंकेचे प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांनी याची पुष्टी केली. सूर्य आणि दुनिथ यांचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, क्रिकेटप्रेमींनी सूर्यकुमार यादवच्या या कृतीचं मनापासून कौतुक केलं आहे.