क्रिकेट आणि राजकारणाच्या दोन तेजस्वी तारकांचा एकत्र येणारा एक महत्त्वपूर्ण क्षण लवकरच साक्षीला मिळणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज रिंकू सिंग आणि मच्छलीशहर येथून निवडून आलेल्या समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा 8 जून रोजी लखनऊच्या गोल्फ सिटीमध्ये होणार आहे. दोघांचा विवाह सोहळा 18 नोव्हेंबरला वाराणसीतील ताज हॉटेलमध्ये पार पडणार आहे. ही माहिती प्रिया सरोज यांचे वडील आणि समाजवादी पक्षाचे आमदार तूफानी सरोज यांनी दिली. त्यांनी सांगितले की, साखरपुडा एक कौटुंबिक समारंभ असेल ज्यात जवळचे नातेवाईक व मित्र उपस्थित राहतील, तर लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार असून, त्यासाठी क्रिकेटपटू, बॉलिवूड कलाकार, उद्योगपती आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांना आमंत्रण दिले जाणार आहे.
मैत्रीतून प्रेम, प्रेमातून विवाह
माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार, रिंकू आणि प्रिया यांची ओळख एका सामान्य मित्राच्या माध्यमातून झाली होती. त्यातून हळूहळू मैत्री निर्माण झाली आणि पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही पुरेसा वेळ घेत एकमेकांना समजून घेतले आणि नंतर कुटुंबियांच्या संमतीने विवाहाचा निर्णय घेतला. रिंकू सिंग यांचे प्रशिक्षक मसूद अमीनी यांनीही या साखरपुड्याच्या बातमीला दुजोरा दिला. “८ जून रोजी लखनऊमधील गोल्फ सिटी येथे साखरपुडा होणार आहे. मला आमंत्रण मिळाले असून, माझे कुटुंबही सहभागी होणार आहे. इतर अनेक क्रिकेटपटूंनाही बोलावले आहे,” असे त्यांनी सांगितले.
प्रिया सरोज कोण आहेत?
२६ वर्षीय प्रिया सरोज या व्यवसायाने वकील असून, त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मच्छलीशहर मतदारसंघातून पहिल्यांदाच खासदार म्हणून विजय मिळवला आहे. त्यांचे वडील तूफानी सरोज हे सध्या केराकतचे आमदार आहेत.
रिंकू सिंगची क्रिकेट कारकीर्द
रिंकू सिंग (२७ वर्षे) हे त्यांच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात. त्यांनी भारताकडून २ वनडे आणि ३३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये ते कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी नियमित खेळत असून, त्यांच्या ‘फिनिशिंग’ क्षमतेने त्यांना विशेष स्थान मिळवून दिले आहे.
चर्चेचा विषय ठरणारी युती
हा साखरपुडा आणि पुढील विवाह सोहळा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे, तर क्रिकेट आणि राजकारण या दोन क्षेत्रांमधील चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. चाहत्यांमध्ये या युतीबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे