शनिवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये लाहोर येथील गद्दाफी स्टेडियममध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे खेळ खेळले जात होते. या मॅचच्या सुरुवातीला जेव्हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू राष्ट्रगीतासाठी उभे राहिले तेव्हा एक अशी घटना घडली ज्यामुळे तिथे असलेल्या क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. ज्यावेळी खेळाडू राष्ट्रगीतासाथी उभे होते त्यावेळी चुकून आयोजकांनी भारताचे राष्ट्रीय गीत लावले. यामुळे तिथे असलेल्या प्रेक्षकांमधून एकच गोंधळ ऐकायला मिळाला. यामुळे आयसीसी आणि पाकिस्तान बोर्डाची मोठी चूक समोर आली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच पाकिस्तानची मस्करीदेखील केली जात आहे.
राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर तेथील आयोजकांना लगेचच त्यांची चूक कळली. त्यांनी जेव्हा राष्ट्रगीत सुरु केले तेव्हा त्यामध्ये 'भारत भाग्य विधाता' हे बोल कानावर पडले. दरम्यान ही क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. मात्र आशा चुका होण्याची ही पहिलीच वेळ नाही . टुर्नामेंट सुरु होण्याआधी कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये भारतीय ध्वज का फडकवला नाही? असा मोठा प्रश्न उपस्थित केला होता. यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यावर उत्तर दिले की, भारतीय संघ येथे येणार नाही त्यामुळे ध्वज लावला नाही". मात्र या वादानंतर भारतीय ध्वज फडकावण्यात आला.
गुरुवारी दुबईत खेळल्या गेलेल्या भारत आणि बांग्लादेश यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याच्या थेट प्रक्षेपणादरम्यान दाखवण्यात आलेल्या स्पर्धेच्या लोगोमध्ये देशाचे नाव नसल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) खेळाच्या प्रशासकीय मंडळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) नाराजी व्यक्त केली आहे.