रेल्वे वाहतूक हा भारतातील दळणवळणाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. हा प्रवास सुखकर व्हावा आणि जास्तीत जास्त चांगल्या सुविधा प्रवाशांना मिळाव्या, यासाठी रेल्वे विभाग नेहमी तत्पर असतो. यातच एक महत्वाचे पाऊल पश्चिम रेल्वेनं उचललं आहे. या मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकावर डिजिटल लाऊंज म्हणजेच विश्रामगृह कम को-वर्किंग स्पेस उभारण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात प्रवाशांना रेल्वे परिसरात विमानतळासारख्या सुविधा मिळणार आहेत.
बऱ्याच वेळेला ट्रेन काही कारणामुळे लेट होतात किंवा इतर काही कारणामुळे प्रवासी प्रतिक्षालयात (वेटिंग रूम) बसून वाट पाहत असतात, किंवा जादाचे पैसे देऊन एक्झिक्युटिव्ह लाऊंजमध्ये आराम करतात. मात्र तिथे बसून ऑफिसचे काम करता येत नाही. मात्र ही सुविधा' या डिजिटल लाऊंजद्वारे प्रवाशांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. कार्यालयीन काम असो की कॉलेजसंबंधीचा अभ्यास करणे, आता स्टेशनवरच शक्य होणार आहे. यामुळे प्रवासांना वेळ वाया न घालवता ई-मेल, मिटिंग, एप्रोजेक्ट, प्रेजेंटेशन वर्क इत्यादी कामे करता येणार आहेत.
हे लाऊंज विमानतळाइतकेच अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असणार आहे. प्रवाशांना इथे चार्जिंग पॉईंट, वायफाय, टेबल, सोफा, कॅफे, मोफत वीज, साउंड प्रूफ झोन अशा सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना विना व्यत्यय आपल्या ऑफिसचे काम रेल्वे स्टेशन आवारात करता येणे शक्य होणार आहे. आजकाल शहरातील बहुतांशी लोक फ्रिलान्सर म्हणून काम करत असतात. अशा लोकांना ही डिजिटल लाऊंजची एक पर्वणीच ठरणार आहे. ही सेवा केवळ प्रवाशांसाठी नसून बाहेरील लोकांसाठीही पुरवली जाणार आहे. सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून मुंबई सेंट्रल स्थानकाची निवड करण्यात आली असून त्यानंतर वांद्रे टर्मिनस, वडोदरा, अहमदाबाद अशा इतर प्रमुख स्थानकांवर अशी सुविधा लवकरच सुरु करणार आहेत. या सुविधेमुळे रेल्वे प्रशासनाला दरवर्षी सुमारे ५० लाखांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी व्यक्त केला आहे. सध्या को-वर्किंग स्पेससाठी मोठ्या शहरांमध्ये भरमसाठ दर आकारले जात असताना, रेल्वे स्थानकावर सुलभ दरात ही सेवा मिळणं मुंबईकरांसाठी पर्वणी ठरणार आहे.