कोलंबोच्या पी. सारा ओवल मैदानावर सोमवारी अभिमानाचा क्षण उभा राहिला. दृढनिश्चय, जिद्द आणि अपार क्षमता यांची सांगड घालून हिंदुस्थानी अंध महिला क्रिकेट संघाने पहिल्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात नेपाळवर 7 विकेट्सने मात करत हिंदुस्थानने अंध क्रिकेटच्या इतिहासात नवे सुवर्णपान जोडले.
नेपाळने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 114 अशीच मजल मारू शकली. भारतीय गोलंदाजांनी अचूक लाइन-लेंथचा धडाका लावत नेपाळी फलंदाजांना सतत दडपणाखाली ठेवले. नेपाळच्या संपूर्ण डावात एकच चौकार नोंदवला गेला, यावरून भारताच्या गोलंदाजीची निर्भेळ शक्ती स्पष्ट दिसून आली. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केलं. संयमी पण निर्धारपूर्ण अशा खेळीसह फलंदाजांनी धावांचा ओघ सुरळीत ठेवला. फुला सरेनने सर्वाधिक 44 नाबाद धावा करत भारताच्या विजयी डावाची किल्ली ठरली. 12व्या षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य पार करत भारतीय संघाने जगज्जेतेपदावर आपली छाप उमटवली.
यापूर्वीच्या उपांत्य फेरीत भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते, तर नेपाळने पाकिस्तानला मोठा धक्का दिला होता. मात्र अंतिम सामन्यात भारतीय मुलींच्या दमदार प्रदर्शनासमोर नेपाळ टिकू शकले नाही. यजमान श्रीलंकेलाही या स्पर्धेत गृहमैदानाचा लाभ मिळाला नाही; पाचपैकी केवळ एका सामन्यात (अमेरिकेविरुद्ध) त्यांना विजय मिळवता आला.
या विजयानंतर हिंदुस्थानच्या अंध महिला क्रिकेट संघावर स्तुतीचा वर्षाव होत आहे. हे विजेतेपद फक्त ट्रॉफीपेक्षा अधिक आहे, हे दृढ संकल्प, परिश्रम आणि अशक्याची वाटही शक्य होऊ शकते याचा जिवंत पुरावा आहे. देशभरातून या विश्वविजेत्या मुलींना सलाम केला जात आहे.
थोडक्यात
कोलंबोच्या पी. सारा ओवल मैदानावर सोमवारी अभिमानाचा क्षण उभा राहिला.
दृढनिश्चय, जिद्द आणि अपार क्षमता यांची सांगड घालून हिंदुस्थानी अंध महिला क्रिकेट संघाने आहे.
पहिल्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात नेपाळवर 7 विकेट्सने मात करत हिंदुस्थानने अंध क्रिकेटच्या इतिहासात नवे सुवर्णपान जोडले.