Niketan Dalal Death : दिव्यांग असूनही आयरनमॅन स्पर्धेत देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करणारे निकेत दलाल यांचा दुर्दैवी निधन झाला आहे. मंगळवारी (1 जुलै) सकाळी छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
माजी उपमहापौर लता दलाल यांचे पुत्र असलेले निकेत श्रीनिवास दलाल (वय ४३) हे खडकेश्वर परिसरात राहत होते. 30 जूनच्या रात्री त्यांच्या घराला अचानक आग लागली. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांच्या मित्रांनी त्यांना कार्तिकी हॉटेलमध्ये थांबवले होते. मात्र, मंगळवारी सकाळी 8 वाजता हॉटेलच्या पार्किंगमध्ये ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. तातडीने त्यांना घाटी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेत त्यांना शरीरावर गंभीर जखमा झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. क्रांती चौक पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्याकडून या घटनेची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
निकेत दलाल यांचे जीवन संघर्षमय होते. दुसऱ्या वर्गात असताना सायकलच्या स्पोक लागल्यामुळे एका डोळ्याची दृष्टी गेली. पुढे काही वर्षांत दुसऱ्या डोळ्यावर ल्यूकेमियाचा परिणाम झाल्याने त्यांची पूर्ण दृष्टी गमावली. मात्र या अंधत्वाने त्यांचा आत्मविश्वास कमी केला नाही. 2019-20 मध्ये त्यांनी दुबई येथे झालेल्या आयरन मॅन स्पर्धेत दिव्यांग विभागात भाग घेतला आणि 1.5 किमी जलतरण, 90 किमी सायकलिंग, 21.1 किमी धावणे हे सर्व टप्पे पार करून देशातील पहिले दिव्यांग आयरन मॅन बनले. तसेच, त्यांनी जगात पाचवा क्रमांक पटकावला होता. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल संपूर्ण देशाने घेतली होती.
निकेत दलाल हे अंधत्व असूनही सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय होते. त्यांनी अनेक दिव्यांग व्यक्तींना क्रीडा आणि जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यातील सामाजिक, क्रीडा आणि राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.