(Hydrogen Train )भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी रेल्वे आता सेवेसाठी सज्ज झाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी सोशल मीडियावरील ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर याचा व्हिडिओ शेअर करत देशवासीयांना पहिली झलक दाखवली.
हायड्रोजन तंत्रज्ञानामुळे प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक प्रवासाची संधी मिळणार असून, या क्षेत्रात भारत जगातील पाचवा देश ठरणार आहे. जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीननंतर हायड्रोजन रेल्वे चालवणाऱ्या देशांच्या यादीत भारताचे नाव जोडले जाणार आहे.
पहिली हायड्रोजनवर चालणारी रेल्वे सेवा हरियाणातील जिन्द–सोनीपत मार्गावर सुरू होणार असून, या नव्या तंत्रज्ञानामुळे इंधनाचा खर्च कमी होईल आणि कार्बन उत्सर्जन शून्यावर येईल. या प्रकल्पाला ‘ग्रीन इंडिया’ उपक्रमाचा एक महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, लवकरच या सेवेसाठी चाचणी सुरू होणार असून, त्यानंतर प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वे खुली केली जाईल.