प्रसिद्ध युट्यूबर समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लॅटेंट' खुप चर्चेत राहिला आहे. या शोमध्ये केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे रणवीर अलाहाबादिया अडचणीमध्ये आला. त्याच्या विरोधात अनेक गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत. त्याच्याबद्दलची अजून एक अपडेट आता हाती आली आहे. आई-वडिलांबद्दल केलेल्या वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या रणवीर तसेच त्याच्याबरोबर असलेल्या आशिष चंचलानीला महाराष्ट्र सायबर सेलच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
रणवीर आणि आशिष या दोघांनाही नवी मुंबई येथील महापे येथील महाराष्ट्र सायबर सेलच्या मुख्य न्यायालयात चौकशीसाठी हजर राहिले होते. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार आणि पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर आणि आशिषचे जबाब नोंदवले असून त्यांच्या विरोधात पुढील तपास सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयाने युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने युट्यूबरला तो देत असलेल्या कंटेंटबद्दल फटकारले होते. न्यायालयाने रणवीरला अटकेपासून दिलासा दिला असून त्याला चौकशीत सामील होण्याचे निर्देश दिले आहेत. जेव्हाही चौकशीसाठी बोलवले जाईल तेव्हा चौकशीसाठी हजर राहावे लागेल असे आदेश न्यायालयाने दिले होते. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी केल्यानंतर, रणवीर विरोधात त्या विधानासाठी कोणताही नवीन गुन्हा दाखल केला जाणार नाही अशी माहिती मिळत आहे.