ताज्या बातम्या

Nashik Airport : ‘इंडिगो’चा मोठा निर्णय' तांत्रिक कारणामुळे नाशिकहून बंगळुरू, दिल्ली विमानसेवा तूर्त स्थगित

नाशिककरांसाठी महत्त्वाची मानली जाणारी इंडिगोची नाशिक–दिल्ली सकाळची विमान सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

Published by : Varsha Bhasmare

नाशिककरांसाठी महत्त्वाची मानली जाणारी इंडिगोची नाशिक–दिल्ली सकाळची विमान सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. यापूर्वीच नाशिक–बंगळूर विमान सेवा बंद करण्यात आली होती. कंपनीकडून “तांत्रिक कारण” पुढे करण्यात आले असले तरी पायलटच्या कामकाजाच्या पुनर्नियोजनासाठी ही कपात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे व्यावसायिक, उद्योगपती आणि नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.

नाशिकमधील ओझर विमानतळावरून सध्या सहा प्रमुख शहरांशी हवाई संपर्क आहे. त्यात दिल्ली ही सर्वाधिक महत्त्वाची सेवा मानली जाते. दिल्लीहून सकाळी ६.४५ वाजता निघणारे विमान सकाळी ८.३० वाजता नाशिकमध्ये दाखल होत असे. त्यानंतर नाशिकहून सकाळी ९ वाजता उड्डाण घेणारे विमान ११ वाजता दिल्लीला पोहोचत असे. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशी आठवड्यातील तीन दिवस ही सेवा उपलब्ध होती. आता ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

याशिवाय नाशिक–बंगळूर विमान सेवादेखील आधीच स्थगित करण्यात आली आहे. या मार्गावर मंगळवार आणि गुरुवार अशी आठवड्यातील दोन दिवस सेवा होती. दुपारी १.२० वाजता बंगळूरहून निघणारे विमान ३ वाजता नाशिकला पोहोचत असे, तर नाशिकहून दुपारी ३.४० वाजता निघणारे विमान सायंकाळी ५.३० वाजता बंगळूरला पोहोचत असे. ही सेवा महिनाभरासाठी बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

विमान कंपनीने अधिकृतरीत्या तांत्रिक कारणे पुढे केली असली तरी देशभरातील अनेक विमान कंपन्या पायलटच्या कामाच्या वेळांचे पुनर्नियोजन करत असल्याचे समोर येत आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) नियमांनुसार पायलटच्या कामाच्या तासांवर मर्यादा आहेत. त्या पार्श्वभूमीवर कंपन्यांकडून उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल आणि काही सेवांमध्ये कपात केली जात असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, नाशिककरांमध्ये या निर्णयामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेषतः दिल्ली आणि बंगळूर ही दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रे असल्याने उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. रेल्वे किंवा मुंबईमार्गे विमान प्रवास हा एकमेव पर्याय उरल्याने वेळ आणि खर्च दोन्ही वाढणार आहेत.

ओझर विमानतळाचा विस्तार आणि अधिक उड्डाणांची मागणी सातत्याने होत असताना उलट सेवा बंद होणे ही चिंतेची बाब असल्याचे स्थानिक व्यावसायिक संघटनांचे म्हणणे आहे. इंडिगोकडून ही सेवा पुन्हा कधी सुरू होणार याबाबत अद्याप स्पष्ट घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे नाशिककरांचे लक्ष आता कंपनीच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा