इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटाजवळ 20 जुलै 2025 रोजीएका प्रवासी जहाजाला समुद्रात आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 5 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 280 हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी यांना वाचवण्यात आले आहेत. दरम्यान, बचाव कार्य अजूनही सुरूच आहे.
केएम बार्सिलोना 5 हे जहाज टालाऊड या बेटावरून उत्तर सुलावेसीची राजधानी मनाडोकडे निघाले होते. दरम्यान, तालिसेच्या समुद्रात असताना जहाजाला अचानक आग लागली. ही माहिती इंडोनेशियन फ्लीट कमांडचे उपकमांडर व्हाइस अॅडमिरल देनिह हेन्द्राता यांनी दिली.
या घटनेनंतर नौदलाची 3 जहाजे घटनास्थळी पाठवण्यात आली असून आतापर्यंत 284 प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षितपणे बाहेर काढले गेले आहेत. स्थानिक मच्छीमारांनीही बचावकार्यात सहभाग घेतला आणि काही प्रवाशांना समुद्रात वाहून जात असताना वाचवले.
बचाव पथकांनी 5 मृतदेह मिळवले आहेत, त्यात एका गरोदर महिलेसह अन्य प्रवाशांचाही समावेश आहे. अद्याप एकूण प्रवासी संख्या स्पष्ट झालेली नाही. तसेच जखमींबाबतही कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
व्हाइस अॅडमिरल हेन्द्राता म्हणाले की, “आमचे सर्व लक्ष सध्या बचावावर केंद्रित आहे.” या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, त्याचा तपास सुरू आहे.
राष्ट्रीय शोध व बचाव संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जहाजातून केशरी ज्वाळा आणि काळा धुर दिसत होता, तर घाबरलेले प्रवासी लाइफ जॅकेट घालून समुद्रात उड्या मारत होते, असे व्हिडीओ आणि फोटोद्वारे दिसून आले.
इंडोनेशिया हा 17 हजारापेक्षा अधिक बेटांचा देश असून, येथे जलमार्ग हा प्रवासाचा एक महत्त्वाचा मार्ग मानला जातो. मात्र, सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याने येथे अपघात वारंवार घडत असतात.
केवळ काही दिवसांपूर्वी मेंतावाई बेटाजवळ 18 जणांना घेऊन जाणारी एक स्पीडबोट वादळात उलटली होती. मात्र, 14 जुलै रोजी हे सर्वजण सुखरूप सापडले. त्याच महिन्याच्या सुरुवातीला बाली बेटाजवळ एक फेरी बुडाली होती. या दुर्घटनेत किमान 19 जणांचा मृत्यू झाला आणि 16 जण बेपत्ता झाले होते. शोध मोहिमेत 1 हजाराहून अधिक बचाव कर्मचारी, 3 नौदल जहाजे, 15 बोटी, 1 हेलिकॉप्टर आणि डायवर्स सहभागी झाले होते.
हेही वाचा