छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. मात्र आता त्याला तेलंगणामधून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. याआधी प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता मात्र तो न्यायालयाने फेटाळला होता.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्याने इंद्रजीत सावंत यांनादेखील धमकी दिली होती. एक महिन्याआधी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. सुरुवातीला नागपुरात असणारा प्रशांत चंद्रपुरमध्ये लपून बसला होता. अशातच आता त्याला तेलंगणामधून अटक केल्याची बातमी समोर आली आहे. त्याचप्रमाणे उद्या त्याला कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
नक्की काय घडलं ?
24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री कोरटकरने इंद्रजित सावंतांना फोन केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत सावंतांना धमकी दिली होती. 25 फेब्रुवारीला इंद्रजित सावंत यांच्या तक्रारीवरून कोल्हापूरच्या राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीनदेखील मंजूर केला होता. याबद्दल कोल्हापूर पोलिसांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आणि नंतर कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला.