"रायगड हा केवळ इतिहासाच भाग नाही, तर तो आपल्या अस्मितेचं, स्वराज्याचं आणि आत्मगौरवाचं प्रतीक आहे. ज्यांनी रायगड केला, ते छत्रपती झाले. शिवाजी महाराजांचा विचार ही केवळ परंपरा नसून ते आत्मचिंतनाचं साधन आहे," अशा शब्दांत छत्रपती संभाजीराजेंनी शिवराज्याभिषेक सोहळ्यातून भावनिक आणि ठाम भूमिका मांडली.
ते म्हणाले, “2007 मध्ये सुरू झालेला हा सोहळा आज लोकचळवळीत रूपांतरित झाला आहे. साडेतीनशे वर्षांनंतरही शिवाजी महाराजांच्या नावातली ताकद अजूनही जिवंत आहे. हेच त्यांचं खरं महानत्व आहे!”
“शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य परकीय सत्तांसाठी नव्हतं. त्यांनी बादशाही शाळा हाकलल्या, आपलं राज्य स्थापन केलं आणि ‘छत्रपती’ बनले. हा राज्याभिषेकाचा दिवस राष्ट्रीय सण म्हणून घोषित व्हावा, ही केवळ माझी मागणी नाही, तर संपूर्ण जनतेची भावना आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
“शालेय पुस्तकांमध्ये युरोपियन इतिहास, नेपोलियन, मुघल साम्राज्य यांना भरपूर जागा आहे. पण शिवाजी महाराज कुठे आहेत? कोणत्याही बोर्डात SSC, CBSE, ICSE, कॉलेज त्यांच्यावर दोन पानंही नाहीत. ही मोठी शोकांतिका आहे,” असं ते म्हणाले.
त्यांनी सरकारला सुचवलं की,
“जर शिवाजी महाराजांचा विचार पुढच्या पिढीच्या मनात रुजवायचा असेल, तर शैक्षणिक अभ्यासक्रमात त्यांचा समावेश बंधनकारक करावा. त्यासाठी एक समिती नेमून, ‘शिवाजी महाराज सनियम’ तयार करावा, जो सर्व स्तरांवर बंधनकारक असेल.
“महिलांवरील अत्याचार, जातीय भेद, धर्मांतर यांसारख्या समस्या आजही आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात हे नव्हतं. मग आपण खऱ्या अर्थाने स्वराज्य जगतो का? हे आत्मचिंतन करायची वेळ आली आहे.”
“रायगड ही आपली पवित्र राजधानी आहे. याच गडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला, आणि याच गडावर त्यांनी जीवन संपवलं. हा किल्ला विजयाचा साक्षीदार आहे, तसाच तो बलिदानाचाही. त्यामुळे याचं जतन हे केवळ ऐच्छिक काम नाही, तर शिवभक्तांचं पहिलं कर्तव्य आहे.” त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हटलं. “या कार्यक्रमाला या, पण मोकळ्या हाताने नाही. रायगडच्या संवर्धनासाठी ठोस निर्णय घेऊन या. ही जागा राजकारणासाठी नाही, हे व्यासपीठ आहे स्वराज्यासाठी!”
छत्रपती संभाजीराजेंनी आजच्या काळातील शिवाजी महाराजांचा सांस्कृतिक वापर आणि राजकीय दुरुपयोग यावरही भाष्य केलं. “सिनेमात, भाषणात, नाटकात शिवाजी महाराज कधी गौरवले जातात, कधी अपमानित. एक पार्टी शिवी देते, दुसरी समर्थन करते. हा गोंधळ थांबायला हवा. त्यासाठी नियम असावा, एक 'सनियम' असावा."
हेही वाचा